जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२४ । देशभरात सणासुदीचे दिवस अगदी जवळ येऊन ठेपले आहेत. मात्र अशातच ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशावरील भार आणखी वाढण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात देशवासीयांना महागाईचा धक्का बसण्याची शक्यता असून खाद्यतेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. लवकरच या किमती वाढवण्याचा मोठा निर्णय सरकारकडून घेतला जाऊ शकतो.
खरंतर सरकारच्या या निर्णयामागे व्यावसायिकांचा दबाव आहे. मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांच्या दबावाचा थेट परिणाम केंद्र सरकारकडून भाव वाढवून घेतला जाऊ शकतो. याचाच अर्थ सणापूर्वी महागाईने सर्वसामान्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
यापूर्वी राज्यातील व्यापाऱ्यांच्या मागणीवरून सरकारने काबुली हरभऱ्यावरील साठा मर्यादा हटवली होती तर आता मोदी सरकार खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्कात वाढ करण्याची शक्यता आहे ज्यामुळे सणासुदीपूर्वी खाद्यतेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. आता केंद्र सरकार लवकरच ६,८०० कोटीच्या राष्ट्रीय तेलबिया अभियानाची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत स्थानिक उत्पादनांना चांगला भाव मिळावा यासाठी सरकार आयात शुल्क वाढवू शकते जेणेकरून स्थानिक उत्पादनांना चांगला भाव मिळू शकेल.
इतकंच नाही तर केंद्रीय कृषी मंत्रालयाने खाद्यतेलांवरील आयात शुल्कातही वाढ करण्याची सूचना केली असून कृषी मंत्रालयाने यामागे देशी तेलबिया उत्पादकांच्या हिताचे रक्षण करण्याचे कारण सांगितले. सध्या कच्चे (क्रूड) पाम तेल, सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावर ५.५% आयात शुल्क आकारले जाते ज्यामध्ये उपकराचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे रिफाइंड खाद्यतेलावर १३.७५% सीमाशुल्क आकारले जाते. या सर्व घडामोडींमध्ये सोयाबीनच्या कमी झालेल्या भावामुळे मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संतप्त दिसत असून जोपर्यंत सीमा शुल्क वाढत नाही तोपर्यंत तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे तसेच कठीण असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.