जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२४ । राज्यातील अनेक भागात जोरदार हजेरी लावल्यानंतर आता पावसाने काही ठिकाणी उसंती घेतली आहे. तर काही ठिकाणी अद्यापही पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. दरम्यान, हवामान खात्याने आजही काही भागात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलाय.
आज कुठे कोसळणार पाऊस?
हवामान खात्याने आज पुणे तसेच रायगड आणि सातारा या जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईसह उपनगरातही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर आणखीच वाढणार असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय.
दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. नाशिकसह, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात आज दमदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि परभणीत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहे.
विदर्भातील, नागपूर, अकोला, अमरावती, वाशिम, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस देशासह महाराष्ट्रात पावसाची अशीच स्थिती राहील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
जळगावात पावसाची उसंती?
जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे. दरम्यान जिल्ह्यात पावसाने पुन्हा उसंती घेतली. यामुळे मंगळवारी तापमानात वाढ होऊन दुपारपर्यंत पारा ३१.३ अंशांवर पोहोचला होता. जिल्ह्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळत असून जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी कोसळू शकतात . तर उद्या २९ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.