जळगाव जिल्हा

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरल्या प्रहारच्या रणरागिणी!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यावलला रास्तारोको आंदोलनाने चक्काजाम, महिला, पुरुष झाले आक्रमक

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२४ । बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, दोषींवर कार्यवाही करावी, अशा महिला व मुलींच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे महिला जिल्हाध्यक्ष ॲड.नंदिनी यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार दि.२१ रोजी यावल येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

बदलापूर घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून त्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आज यावल येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी झालीच पाहिजे, नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे, महिला, मुलींची सुरक्षा करणार कोण?, सरकार करते काय, खाली डोके वरती पाय अशा घोषणा देत आंदोलकांनी रास्तारोको केला. टी पॉइंट चौकात ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पोलीस प्रशासनाला दिले निवेदन
आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन दिले असून त्यात आंदोलकांवरील गुन्हे त्वरीत मागे घ्यावे, अत्याचार करणाऱ्या नराधमांसाठी कठोर कायदा करणे, बदलापूर घटनेची सखोल चौकशी करणे, शाळा प्रशासन, पोलीस आणि संबंधित दोषींवर लवकरात कारवाई करावी, सतीसावित्री, विशाखा समितीची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, शाळा, महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षक असावे अशी मागणी करण्यात आली आहे.

यावलचा टी पॉइंट झाला जाम
प्रहारच्या आंदोलनाने यावलच्या टी पॉइंटवर आंदोलकांची मोठी गर्दी जमली होती. सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनाने रस्त्याच्या तिन्ही बाजूला वाहनांची भली मोठी रांग लागली होती. यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या पथकाने आंदोलनानंतर लागलीच वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करुन वाहन चालकांना वाट मोकळी करुन दिली.

चौधरी परिवार उतरला रस्त्यावर
बदलापूर येथील अत्याचाराच्या निषेधार्थ आज प्रहार जनशक्ती पक्षातर्फे पुकारण्यात आलेल्या आंदोलनात चौधरी परिवार रस्त्यावर उतरून आक्रमक झाला. आंदोलनात अनिल छबिलदास चौधरी, मुलगी हर्षा चौधरी, ॲड.नंदिनी चौधरी, भाची आरती काठोके, मुलगा धीरज चौधरी, मनीष चौधरी यांच्यासह इतर नातेवाईक आंदोलनात सहभागी झाले होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button