जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२४ । जळगावमधून लाचखोरीची आणखी एक घटना समोर आलीय. तडजोडीअंत ३६ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या कामगार निरीक्षकाला जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. चंद्रकांत पाटील (वय-५७, रा. जळगाव) असे अटक केलेल्या लाचखोर कामगार निरीक्षकाचे नाव असून या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नेमका प्रकार काय?
तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवाशी आहेत. ते माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तथा मुकादम म्हणून करत होते. तक्रारदार यांना मुकादम पदावरून स्थगिती देण्यात आली होती. याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. दरम्यान या सुनावणीचा निकाल लावण्यासाठी कामगार निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी सदर सुनावणीचा निकाल सहाय्यक कामगार आयुक्त यांना सांगून लावून देतो असे सांगत तक्रारदार यांना ५० हजारांची लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे ५ ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती.
या तक्रारीची पडताळणीसाठी गुरुवार ८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचला. त्यावेळी कामगार निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी तडजोडी अंती ३६ हजारांची लाच घेतांना पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी चंद्रकांत पाटील ( वय-५७, रा. जळगाव ) यांच्या विरुध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.