आज महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा ; जळगावात कशी राहणार स्थिती?
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२४ । मागील गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं. सोमवारी जळगावसह काही जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली. मात्र आज मंगळवारी राज्यातील विविध भागात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज या जिल्ह्यांना अलर्ट?
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज राज्यातील तब्बल 15 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आज रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा तसेच सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय.
मध्य महाराष्ट्रातही आज मुसळधार पाऊस पडू शकतो. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
आज जळगाव कशी राहणार स्थिती?
हवामान खात्यानं आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा कुठलाही अलर्ट दिला नाहीय. परंतु आज काही ठिकाणी दिवसभरात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस झालाय. सततच्या पावसाने अनेक ठिकाणी खरिपाचे पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतेत आहे.