दररोज हजारो लिटर इंधनाची बचत; काम वेगाने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
जळगाव लाईव्ह न्यूज । धरणगाव, चोपडा व जळगाव या तीन तालुक्यांच्या दृष्टीने फायदेशीर असणारा व तापी नदीवरील खेडी व भोकर या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या ६६० मीटर पुलामुळे ७० किलोमीटरचे अंतर अवघ्या १५ किलोमीटरवर येणार आहे. यामुळे ग्रामस्थांना तर याचा फायदा होईलच त्यासोबत परिसरातील केळी उत्पादक शेतरकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे दररोज हजारो लिटरचे इंधन तर वाचेलच त्याशिवाय केळीची वाहतूक जलद गतीने होईल.
खेडी-भोकरी ते भोकर दरम्यानचा पूल व्हावा म्हणून गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता. या कामांसाठी तब्बल १५२ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. खेडी-भोकर या दोन गावांना खेडी- भोकर ते चोपडा हे अंतर फक्त १५ किलोमीटरचे आहे. मात्र, तापी नदीवरील पुलाअभावी हे अंतर ७० किलोमीटरचे होते. परिणामी शेतकऱ्यांचा व नागरिकांचा वेळ व पैसा देखील खर्च होतो. खेडी-भोकरी व भोकर दरम्यान पूल झाल्यास परिसरातील हजारो ग्रामस्थ व वाहनधारकांचा फेरा वाचणार आहे.
खेडी भोकर, भादली, कठोरा, किनोद, गोरगावले, गाढोदे, करंज, सावखेडा आदी गावातील शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी सध्या दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. पुलाअभावी फेऱ्याने जावे लागते. यामुळे शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्यांचा वेळ तर जातोच शिवाय आर्थिक भुर्दंडही बसतो. ना.गुलाबराव पाटील यांनी मध्यंतरी कामाचा आढावा घेवून पुलाचे कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार, आतापर्यंत सुमारे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. जलद गतीने काम सुरु असून नजिकच्या काळात ते पूर्ण होणे अपेक्षित आहे.
केळी उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा
या परिसरात केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. येथून चोपडा, शिरपूर मार्गे मध्यप्रदेश व पुढे उत्तर भारतात केळीची वाहतूक केली जाते. या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर केळी उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. वेळ व पैसा दोन्हींची बचत होईल. या पुलामुळे परिसरातील गावांचा झपाट्याने विकास होईल, असा विश्वास ना.गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.
असा असेल पूल
तापी नदीवरील खेडी-भोकरी ते भोकदरम्यानचा पूल हा तब्बल ६६० मीटर लांब आहे. यात प्रत्येकी ३० मीटरचे २२ गाळे असणार आहेत. सदर पुलाच्या दोन्ही बाजूस सुमारे ६५० मीटर लांबीचे पोच रस्ते असतील. दोन्ही बाजूला भराव टिकवून ठेवण्याकरिता बॉक्स रिटर्न व पाइल फाउंडेशनसह रिटेनिंग वॉल असणार आहे.