जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२४ । राज्यात मागील दोन दिवसात मुसळधार पाऊस झाला असून यामुळे अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. याच दरम्यान गिरणा नदीच्या पाण्यात मासे पकडायला गेलेले १२ जण अडकल्याची घटना रविवारी घडली असून तब्बल १८ तासांहून अधिक कालावधी उलटूनही त्यांना अद्याप नदीपात्रातून बाहेर काढता आलेले नाही.
घटनेबाबत अधिक असे की,नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील पाणी नदीपात्रात सोडले जात असल्यामुळे नद्यांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. यातच मालेगावच्या संवदगाव शिवारात गिरणा नदीत काही युवक मासे पकडण्यासाठी गेले होते. मात्र त्यावेळी रविवारी सायंकाळी नदीचे अचानक पाणी वाढू लागले. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे १२ जण नदीच्या पाण्यात अडकले.
पाणी जास्त वाढल्यामुळे ते परत येऊ शकले नाही. ते अडकून पडले. त्या युवकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनातर्फे रविवारीपासून बचावकार्य सुरु करण्यात आले. त्याला अद्यापही यश आले नाही. त्यामुळे रविवारची रात्र देखील त्या युवकांना नदी किनारी काढावी लागली. नदीची पूर पातळीपासून ही टेकडी जवळपास दहा फूट उंच आहे. यामुळे सध्यातरी या युवकांना धोका नाही.
घटनास्थळी युवकांना काढण्यासाठी मालेगाव अग्निशमन दलाचे पथक पोहचले आहे. तसेच धुळ्यावरुन SDRF टीमलाही बोलवण्यात आले. परंतु नदीपात्रातील अडकलेल्या १२ जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला अद्याप यश आले नाही. दरम्यान, अशा आपत्कालीन परिस्थितीत आता हेलिकॉप्टरची मदत घेवून 12 जणांना बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांनी दिली आहे.