जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२४ । श्रावण महिन्याच्या अगोदरच सोने आणि चांदीने विक्रमी भरारी घेतली. गेल्या आठवड्यात दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण झाली होती. मात्र या आठवड्यात सोने आणि चांदीत मोठी वाढ दिसून आली. जळगावच्या सुवर्णपेठेत गुरुवारी ५०० रुपयांची वाढ तर चांदी दरात एक हजार रुपयापर्यंतची वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये सोन्याचे दर पुन्हा वाढतील असे जाणकारांचे मत आहे.
अर्थसंकल्पात कस्टम ड्यूटी घटवल्यानंतर सोने आणि चांदी दरात विक्रमी घसरण झाली होती. सोन्याचा दर ७४ हजारावरून थेट ६९ हजाराच्या घरात आले होते. दुसरीकडे चांदी दर देखील ९३ हजारावरून ८३ हजारावर आले होते. मात्र या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून दोन्ही धातूंमध्ये वाढ होताना दिसून आली.
जळगाव सराफ बाजारात सोमवारी सोने दरात २०० रुपयाची वाढ झाली. मंगळवारी मात्र ४०० रुपयांची घसरण दिसून आली. यानंतर बुधवारी ८०० रुपयांच्या वाढीपाठोपाठ गुरुवारीही ५०० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसात सोने १३०० रुपयांनी वाढले आहे. यामुळे आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात सोन्याचे प्रति तोळ्याचे दर विनाजीएसटी ७०५०० रुपयांवर पोहोचले. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ८५ हजार रुपयावर पोहोचला आहे.