जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२४ । यावल सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत असलेले सावखेडा सिम शिवारातील निंबादेवी धरण ओव्हर फ्लो झाले. सध्या निंबादेवी धरण प्रेक्षणीय पर्यटन स्थळ बनले असून ते ओव्हर फ्लो झाल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
निंबादेवी धरण २००५ साली पूर्णत्वास आले आहे. या धरणामुळे चुंचाळे, सावखेडा सिम, नायगाव, दहिगाव, बोराळे, नावरे, गिरडगाव, वाघोदा, शिरसाड, साकळी, वढोदे या गावांमधील शेत शिवारात विहिरींना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग दुबार उत्पन्न घेण्यासाठी सक्षम झाला आहे. साकळी, चुंचाळे, बोराळे या गावांतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा याच भागातून केलेली आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती, म्हणून महाराष्ट्र शासन लघु पाट बंधारे विभाग जळगावकडून सुरक्षिततेसाठी निंबादेवी धरण क्षेत्रात प्रवेश करण्यास सक्त मनाई केली आहे, तर अनुचित घटना टाळण्यासाठी विशिष्ट प्रतिबंधासह या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवून पर्यटकांसाठी हा धरण परिसर खुला करावा, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.
असे न झाल्यास परिसरातील नागरिक व तालुक्यातील काही संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत? असा इशारा शुक्रवारी येथे जमलेल्या पर्यटकांनी दिला आहे. २६ रोजी सकाळी ११ च्या सुमारास धरण पूर्ण भरून वाहण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे परिसरातून तरुणांनी चांगलीच गर्दी करण्याची सुरुवात केली होती.