जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२४ । केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील सीमा शुल्कात मोठी कपात केल्यानंतर दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात मोठी घसरण झाली असून यामुळे सोन्याचे दर चार महिन्याच्या नीच्चांकीवर पोहोचले आहे. बुधवारी जळगाव सराफ बाजारात सोन्याचा दर ७०० रुपयांनी घसरला. मात्र दुसरीकडे चांदीच्या भावात ५०० रुपयांची वाढ झाली
मंगळवारी २३ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील सीमा शुल्क15 टक्क्यांहून हा कर आता 6 टक्के करण्यात आल्याने सराफा बाजारात चैतन्य आले आहे. ग्राहकांना पूर्वीपेक्षा दोन हजारांनी सोने स्वस्तात खरेदीची संधी आली आहे. या निर्णयानंतर जळगावात मंगळवारी सोन्याचे भाव दोन हजार ८०० रुपयांनी कमी होऊन ७० हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते.दरम्यान, मंगळवारी मोठ्या घसरणी पाठोपाठ बुधवारी (२४ जुलै) सोन्याचे भाव पुन्हा ७०० रुपयांनी कमी झाले. त्यामुळे सोने ७० हजार रुपये प्रति तोळ्यावर आले आहे. गेल्या दोन दिवसात सोने दरात तब्बल ३५०० रुपयापर्यंतची घसरण झाली आहे.
यापूर्वी सोन्याचा दर एप्रिल २०२४ महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ७० हजारांवर पोहोचला होते. त्यांनतर सोन्याचे दर सातत्याने वाढताना दिसून आले. मात्र आता सोन्याचा दर चार महिन्यानंतर ७० हजारांवर पोहोचले आहे.
मंगळवारी चांदीचा भाव देखील ३ हजार ८०० रुपयांनी कमी होऊन ती ८५ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली होती. बुधवारी मात्र चांदीत ५०० रुपयांची वाढ होऊन ती ८६ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. दरम्यान सोने चांदी दर उच्चांकीपासून स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.