जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२४ । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील सीमा शुल्कात मोठी कपाची घोषणा करण्यात आली असून त्याचा सराफा बाजारात लागलीच परिणाम दिसून पडला आहे. अर्थसंकल्पानंतर जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 500 रुपयाची घसरण दिसून आली. चांदीच्या दरातही 3 हजार रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे आता सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने सीमा शुल्कात कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांहून कमी करण्यात आली. आता सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 6 टक्के इतके कमी करण्यात आले आहे. या निर्णयाचा सराफ बाजरात परिणाम दिसून पडला.
अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी सोन्यावर लागणारी कस्टम ड्युटी सहा टक्क्याने कमी केल्यामुळे जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव हे 2500 रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे आता जळगावच्या बाजारात सोने 73 हजार 300 रुपयांवरून 70 हजार 500 रुपयावर पोहोचले आहे. तर चांदीचे दर हे 90 हजार रुपयांवरून 87 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.
दरम्यान, सोने दरात घसरण झाल्याने ग्राहकांना मध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाव कमी झाल्यामुळे आम्ही जादा सोन खरेदी करू शकतो अश्या भावना ग्राहकांनी व्यक्त केल्या आहेत. आगामी काळात सण-उत्सव असल्याने सोने आणि चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.