जळगाव लाईव्ह न्यूज | २३ जुलै २०२४ | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्ह्यातील सर्व ११ विधानसभा मतदारसंघानिहाय आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकताच घेतला. याबैठकीत जळगाव ग्रामीण मधून माजी मंत्री गुलाबराव देवकर, एरंडोलमधून माजी मंत्री डॉ.सतीष पाटील व मुक्ताईनगर मधून ॲड रोहिणी खडसे यांच्या नावावर एकमत झाले. तसेच चाळीसगाव मतदारसंघातून माजी आमदार राजीव देशमुख व पाचोरा येथून माजी आमदार दिलीप वाघ यांचे नावे पुढे करण्यात आले.
राष्ट्रवादीच्या या भुमिकेमुळे महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यात प्रामुख्याने जळगाव ग्रामीण, चाळीसगाव व पाचोरा या मतदारसंघांचा समावेश आहे. तिन्ही मतदारसंघात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची ताकद जास्त आहे. चाळीसगाव येथे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात माजी खासदार उन्मेष पाटील यांनी रणशिंग फुंकले आहे. उन्मेष पाटील यांनी उबाठामध्ये प्रवेश घेतल्यानंतर चाळीसगावमध्ये उबाठा गटाची ताकद वाढली आहे. चाळीसगावला मंगेश चव्हाण विरुध्द उन्मेष पाटील अशीच तुल्यबळ लढत होण्याचे मानले जात असतांना राष्ट्रवादीतर्फे तेथून राजीव देशमुख यांचे नाव पुढे करण्यात आले आहे.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने गुलाबराव देवकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटातर्फे मंत्री गुलाबराव पाटील हे रिंगणात राहतील. यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार देतांना सर्वच विरोधी पक्षांचा कस लागणार आहे. या मतदारसंघात उबाठा गटाचीही ताकद मोठी आहे. यामुळे त्यांना विश्वासात न घेता राष्ट्रवादीने देवकरांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने उबाठा गटामध्ये नाराजीचा सुरु दिसून येत आहे. याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत आहे.
पाचोरा-भडगाव मतदारसंघातून शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या विरोधात उबाठा गटातर्फे वैशाली सुर्यवंशी या तुल्यबळ उमेदवार मानल्या जातात. त्यांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. या मतदारसंघातून भाजपनेते अमोल शिंदे यांनीही निवडणूक लढणारच! अशी भुमिका घेतली आहे. यामुळे ते गतवेळी प्रमाणे भाजपातून बंडखोरी करुन निवडणुकीसाठी उमे राहतील का अन्य कुठल्या पक्षाकडून उभे राहतील? हा मुख्य प्रश्न आहे. मध्यंतरी ते उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून उबाठात प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली होती. आता या मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे दिलीप वाघ यांचे नाव पुढे आहे.
राष्ट्रवादी व उबाठा या दोन्ही गटांची जिल्ह्यात बऱ्यापैकी ताकद आहे व दोन्ही पक्षांकडून इच्छुकांची संख्या देखील जास्त असल्याने. दोन्ही बाजूकडील पक्षश्रेष्ठींचा कस लागणार आहे. मात्र सध्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतलेल्या भुमिकांमुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. स्थानिक पातळीवरील या नाराजी व मानापमान नाट्य कशाप्रकार शमवले जाईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.