जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२४ । नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सहा ते सात आमदारांनी क्रोस वोटिंग केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठा दावा केला असून त्यांनी पक्षाचे आदेश कोणी डावलले आणि फुटीर आमदार कोण हे समजल्याचे म्हटलं आहे. यानंतर आता सहा ते सात आमदार आता रडारवर आहेत. यात फुटीर आमदारांमध्ये शिरीष चौधरी यांच्या नावाची देखील चर्चा आहे.
काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक येत्या 19 जुलै रोजी होणार असून ही बैठक आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ निश्चितीवर चर्चा करण्यासंदर्भात होत आहे. मात्र या बैठकीत फुटीर आमदारांसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.
विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. यात महायुतीचे सगळे 9 उमेदवार विजयी झाले मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीकडून उभ्या करण्यात आलेल्या तीनपैकी दोन उमेदवारांना विजय मिळवता आला. या निवडणुकीत काँग्रेसची सहा ते सात मतं फुटली असल्याचं सांगितले जात असून यापैकी काही आमदारांनी भाजपला तर काहींनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान केल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलीय. त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलंय.
याशिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी फुटलेल्या आमदारांची नावं सांगितली होती. आता फुटीर आमदारांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचं
काय कारवाई होईल?
काँग्रेसचे नागपूरमधील विधानपरिषद सदस्य अभिजीत वंजारी यांनी एका वृत्तवाहीशी बोलताना सांगितले की, क्रॉसव्होटिंग करणाऱ्या आमदारांसाठी कारवाई एकच आहे. ज्यांनी पक्षादेशाचं उल्लंघन केलं, त्यांच्यावर सहा वर्षांसाठी निलंबन हीच कारवाई होणार. असं अभिजीत वंजारी म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसच्या फुटलेल्या मतामध्ये रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांचे देखील नाव असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना आमदार शिरीष चौधरी म्हणाले होते की, आपण क्रॉस मतदान केलेलं नाही,गेल्या तीन पिढ्यांच्या पासून आपला परिवार हा काँग्रेस पक्षाच्या विचारांशी जुळलेला आहे,आज पर्यंत आपण भाजपच्या विरोधात लढलो आहोत,त्यामुळे त्यांच्या सोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याने,थोड्याशा लाभा साठी आपण आज पर्यंत चुकीचे काम केले नाही किंवा पुढेही करणार नाही.
काँग्रेसचे कोणते आमदार रडारवर?
झिशान सिद्दीकी
सुलभा खोडके
शिरीष चौधरी
हिरामण खोसकर
जितेश अंतापूरकर
मोहन हंबर्डे