जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२४ । जळगाव शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र याच दरम्यान चोरट्यांचा एक धक्कादायक प्रकार जळगावात समोर आला आहे. चोरीचा उद्देश सफल व्हावा या उद्देशाने अडथळा ठरणाऱ्या व चोरीच्या ठिकाणावर भुंकणाऱ्या १२ कुत्र्यांना एकाचवेळी ब्रेड्मध्ये विषारी औषध टाकून ठार मारण्यात आले. हा निर्दयी प्रकार आसोदा-मन्यारखेडा रस्त्यावरील दूरदर्शन टॉवरमागील शेती शिवारात घडला आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या आठवड्यात या परिसरातील रेल्वेपुलाच्या पुढे असलेल्या प्रदीप भोळे यांच्या डाळिंबाच्या बागेतून ३० हजार किमतीचे जनरेटचे आर्मेचर चोरट्यांनी लांबवले होते. यासह पीव्हीसी पाइप, लोखंडी अँगलही चोरून नेले होते. यानंतर अन्य ठिकाणीही शेती साहित्य चोरल्याच्या घटना घडल्या. प्रदीप भोळे यांच्या शेतातच लहान आठ कुत्र्यांची पिलं, चार मोठी पाळीव कुत्रे शेतीची राखण करीत होती.
अज्ञात व्यक्ती आल्यास ते भुंकून अटकाव करीत होती. मात्र चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्यांनी गोड ब्रेडमध्ये विषारी औषध घालून ती कुत्र्यांना खाऊ घातली. विषारी औषधाने ही कुत्रे विविध ठिकाणी मरून पडली. चार दिवसांपासून मरून पडल्याने सर्वत्र दुर्गंधी सुटली. परिसरातील शेतकऱ्यांनी ती जमा करून पुरली.