जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२४ । राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे शनिवार (दि.६) व रविवार (दि.७) दोन दिवस जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे.
पक्षाची गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. त्यात जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष यांच्यासह इतर सर्व कार्यकारिणीचे राजीनामे घेऊन नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा विषय एकमताने मंजूर केला होता. विधानसभा निवडणुका जवळ आहेत. त्या दृष्टीने नवीन पदाधिकारी निवडीच्या हालचाली वाढल्या आहेत.
त्यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख हे शनिवारी रात्री नागपूरहून रेल्वेने जळगावला येतील. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. ७) सकाळी १० वाजता जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती पक्ष कार्यालयात होतील. दरम्यान, जिल्हाध्यक्षपदासाठी जिल्हा समन्वयक विकास पवार, सहकार विभागाचे अध्यक्ष वाल्मीक पाटील, प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी, अशेक लांडवंजारी हे मुलाखत देण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते खिरोदा (रावेर) येथे बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतली.