⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२१ । दोन दिवसापूर्वी मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागणी करणार असल्याचे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

गुरुवारी दुपारी मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील तापी नदीकाठच्या गावांमध्ये वादळी पावसाने केळी पिकांबरोबरच इतर पिकांचे, घरांचे तसेच विद्युत पोल व तारांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून माहिती संकलित करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री या नात्याने मी स्वतः राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागणी करणार असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे भरपाई त्यांना मिळवून दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढला असेल त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीमार्फत त्याचबरोबर विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने अधिकाधिक मदत देण्यासाठी प्रयत्नशील राहील असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

तालुक्यातील अंतुर्ली ते उचंदे परिसरातील ३१ गावांना वादळी पाऊस व वाऱ्याने दिलेल्या जोरदार तडाख्यात मोठ्या प्रमाणात केळीचे व घरांचे नुकसान झाले असून आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे उचंदा, मेंढोदे, नायगाव तर रावेर तालुक्यातील निंभोरासीम, विटवा, निंबोल, ऐनपूर, वाघाडी, धामोडी, सुलवाडी व इतर ठीकाणी झालेल्या वादळी वार्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना धीर दिला. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, डॉ.जगदीश पाटील, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन शुभांगी भारदे, तहसीलदार श्वेता संचेती, तहसीलदार उषाराणी देवगुणे, गट विकास अधिकारी संतोष नागटिळक, गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, श्री.भामरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता महेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देत विमा कंपन्यांना देखील लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. तसेच मेंढोदे गावातील १८० घरांचे नुकसान झाल्याने गावकर्यां ना मोफत अन्नधान्य तत्काळ देण्याच्या सुचनाहि प्रांताधिकारी यांना पालकमंत्र्यांनी दिल्या.

मेंढोदे गावाचे पुनर्वसना संदर्भात पुनर्वसन मंत्र्यांची आमदार श्री.पाटील व गावातील सरपंच यांचेसह येत्या पंधरा दिवसात बैठक घेण्यात येईल तसेच कब्जेसाठी आकारणी कमी करण्यासाठी पुनर्वसनमंत्री यांचेकडे मागणी करणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. पिक विमा भरलेले शेतकरी व पीक विमा न भरलेले शेतकरी असे वर्गीकरण करून सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी देता येईल या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच राज्य शासनातर्फे देखील यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जास्तीत जास्त मिळण्यासाठी प्रयत्न करेल असेही पालकमंत्री श्री.पाटील यांनी सांगितले. तसेच वादळी वार्यामुळे विद्युत पोल व तारांची मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे त्याची त्वरित दुरुस्त करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.