जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२४ । नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाने १० पैकी आठ जागांवर मोठा विजय मिळविला असला तरी जळगाव जिल्ह्यातील रावेरच्या जागेवर पराभव पत्करावा लागला आहे. हा पराभव पचवून विधानसभेची तयारी करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गुरुवारी (दि.२७) झालेल्या चिंतन बैठकीत, भाकरी फिरवून काम करणाऱ्या नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी पदाधिकारी व – कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. त्यावर विद्यमान जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनीही तात्काळ होकार देत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्षांचा बैठकीतच राजीनामा घेण्याचा ठराव संमत करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची विशेष बैठक गुरुवारी दुपारी झाली. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष अॅड रवींद्र पाटील, वाल्मीक पाटील, एजाज मलिक आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला जामनेरचे डॉ. मनोहर पाटील व अमळनेत्चे श्याम पाटील यांनी पक्षातील समन्वयाचा अभाव, नेत्यांच्या बैठकांना डावलले जाणे या विषयावरून पक्षाच्या प्रमुखांना धारेवर धरले.
माजी मंत्री देवकरांनीही पक्ष कार्यालयातूनच चालला पाहिजे. काम न करणाऱ्यांना घरी पाठवावे, असे देखील ठणकावून सांगितले. डॉ. सतीश पाटील यांनी नेहमीच्या शैलीत थेट जिल्ह्यातील पक्ष नेतृत्वावर हल्ला चढवला. जिल्ह्यातील सहा ते सात जागा लढवायच्या आहेत; परंतु त्यासाठी पक्षाची ताकद निर्माण होणे गरजेचे आहे; परंतु पक्षाचे अस्तित्व संपले आहे.
पुन्हा निवडून यायचे असेल तर ओबीसी, मुस्लिम व आदिवासींनाही प्रतिनिधित्व देणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील व महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांचा राजीनामा घेण्याची भूमिका जाहीर केली. यावेळी स्वतः ठराव मांडत तो जिल्हा बैठकीत मंजूर करून घेतला, पक्षाचे निरीक्षक प्रसन्नजीत पाटील यांना या निर्णयाबाबत प्रदेशस्तरीय नेत्यांना अवगत करण्याच्या सूचनाही केल्या. दरम्यान बैठकीनंतर अॅड. रवींद्र पाटील यांनी आपण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षनेतृत्वाकडे पाठवल्याची माहिती माध्यर्माना दिली. निवडणुकीच्या निकालानंतर उशिराने बैठक घेतल्याबद्दलही त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. अशोक लाडवंजारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.