जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२४ । जामनेर पोलीस ठाण्यावर गुरुवारी रात्री जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली असून यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. दरम्यान या घटनेची दखल मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली असून त्यांनी या घटनेवर ट्विटही केलं आहे. त्यांनी माध्यमांना या घटनेविषयी माहिती दिली. जनतेचा आक्रोश आणि संताप रास्त आहे. पण कोणीही कायदा हातात घेऊ नये असं महाजन म्हणाले.
नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?
जामनेर तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय मुलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली होती. तियाच्यावर अतिशय दुर्दैवीप्रकारे अत्याचार केला. हे कुणी केलं होतं हे सर्व डिटेक्ट झालंय. लोकांनी त्या आरोपीला आम्ही शिक्षा देतो म्हणत आमच्याकडे सोपवा, अशी मागणी केली. मात्र पोलिसांना तसं करता येत नाही”, असं गिरीश महाजन म्हणाले.
“मोठा जमाव पोलीस ठाण्यावर जमला आणि दगडफेकही झाली. या दगडफेकीची आक्रमकता जास्त असल्याने पोलीस जखमी झाले. तोडफोड झाली. या ठिकाणी भीतीचे वातावरण होते. पोलिसांकडून 15 तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांकडे रेकॉर्ड असून व्हिडीओत दगडफेक आणि जाळपोळ कोणी केली ते दिसत आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.
जामनेरच्या घटनेवर महाजनांचं ट्विट
“गिरीश महाजन यांनी या घटनेवर ट्विटही केलं आहे. “काल रात्री जामनेरात दिसून आलेला जनतेचा आक्रोश आणि संताप रास्त आहे. कोणत्याही संवेदनशील नागरिकाचा संताप अनावर व्हावा असेच कुकृत्य संबंधित नराधमाने केले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मी देखील आपल्या इतकाच संतप्त आणि व्यथित आहे. पण माझी सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया भावनांना आवर घालावा. कोणीही कायदा हातात घेऊ नये. तपास यंत्रणेला त्यांचे काम करू द्यावे. दोषी व्यक्तीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, या दृष्टीने काटेकोर तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिस्थितीवर मी लक्ष ठेवून आहे. संकटग्रस्त परिवाराला आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्याचीही सूचना मी प्रशासनाला केली आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले.