जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२४ । लोकसभा निवडणुकीपूर्वी स्थिर असलेले खाद्यतेलाचे दर गेल्या चार ते पाच दिवसांत पुन्हा वाढले. प्रामुख्याने सोयाबीन, सूर्यफूल तेल प्रतिकिलो ५ ते ७ रुपयांनी महागले. डाळींसोबतच तेलाच्या दराचा भडका उडाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेले सोयाबीन व सूर्यफूल खाद्यतेलाचे दर या आठवड्यात ५ ते ७ रुपये किलोने वाढले. निवडणुकीपूर्वी काही प्रमाणात दरवाढ झाली होती. यानंतर मात्र दर स्थिर होते. गेल्या पंधरवड्यात सोयाबीन तेल ९७ ते ९८ रुपये किलो होते. ते आता १०३ रुपये आहे. तर ९९ रुपये किलोचे सूर्यफूल तेल सध्या १०४ रुपयांपर्यंत गेले आहे. मोहरीच्या तेलात प्रतीकिलो ७ रुपयांची वाढ झाली. शेंगदाणा तेल मात्र १४५ रुपये किलोवर स्थिर आहे. सध्या लोणचे टाकण्यासाठी तेलाची मागणी वाढली आहे. त्यात दरवाढ झाल्याने ग्राहकांना झळ बसत आहे. आगामी काळात पुन्हा दरवाढ होऊ शकते, असा अंदाज व्यापारी निर्मल कोठारी यांनी वर्तवला
डाळींचे दरही वाढले
डाळींचे दर सुद्धा वाढले आहेत. दीड महिन्यापूर्वी ७५ ते ८५ रुपये किलो असलेली चनाडाळा आता ९५ रुपये किलो आहे. मुगडाळीचे दर पंधरवड्यात ३ ते ५ रुपयांनी वाढले. साखर प्रतीकिलो एक ते दोन रुपयांनी महागली आहे.