जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२४ । केंद्रात भाजपाप्रणित एनडीएची सरकार येणार असून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. उद्या रविवार मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान मोदी यांच्या शपथविधीनंतर महाराष्ट्रातून मंत्रिपदी कोणाला संधी मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील खासदारांची संभाव्य यादी समोर आली आहे.
यात जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेल्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या नावाचा समावेश आहे. यामुळे रक्षा खडसेंच्या रूपात जिल्ह्याला दुसरा केंद्रीय मंत्री लाभण्याची शक्यता आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील संभाव्य खासदारांची यादी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या तयारीसाठी बैठकांचा सपाटा सुरु झाला असून नरेंद्र मोदी यांच्यासोबत आणखी काही खासदार मंत्रिपदाची शपथ शक्यता आहे. त्यात महाराष्ट्रातील खासदारांचाही समावेश आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात भाजप, शिवसेना (शिंदे गट) , राष्ट्रवादी अजित पवार गटातील खासदार शपथ घेण्याची शक्यता आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्र भाजमधून २ केंद्रीय मंत्री, २ राज्यमंत्र्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजमधील खासदार पियूष गोयल, नितीन गडकरी, उदयनराजे भोसले, हेमंत सावरा आणि रक्षा खडसे यांच्या नावाचा समावेश होण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव किंवा श्रीरंग बारणे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाला मंत्रिपदाला मिळणार आहे.मंत्रिमंडळात प्रफुल पटेल यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.
असा असेल मंत्रीपदाचा फॉर्म्युला?
मोदी सरकारचा मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात भाजपचे 18 मंत्री असतील तर घटक पक्षांना एकूण 18 मंत्रीपदं दिली जाणार आहेत. त्यात 7 कॅबिनेट आणि 11 राज्यमंत्रीपदं असतील, अशी माहिती मिळत आहे.
एम. के. अण्णा यांच्यानंतर जळगाव जिल्ह्याला मिळेल मान?
यापूर्वी भारताच्या १४ व्या लोकसभेत एरंडोल लोकसभा मतदारसंघातून खासदार असलेले एम. के. अण्णा पाटील हे तत्कालीन पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये २००४ ते २००७ याकाळात ग्रामीण विकास राज्यमंत्री होते. त्यानंतर मात्र जिल्ह्यातील कोण्याही खासदाराला केंद्रात मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. मात्र आता रक्षा खडसे यांना मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे.