जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२४ । केंद्रात NDA चे तिसऱ्यांदा सरकार येत असून उद्या दिल्लीत नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र यापूर्वी देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदी दरात मोठा बदल झाला. शुक्रवारी (7 जून) आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसून आली. सोबतच चांदीही घसरली या घसरणीचे कारण चीनच्या मध्यवर्ती बँकेने सोन्याची खरेदी थांबवल्याचे मानले जात आहे.
सोन्या-चांदीच्या दरात काही काळापासून सातत्याने वाढ होत आहे. याचा परिणाम असा झाला की दोन्ही मौल्यवान धातू उच्चांकावर पोहोचले. विकसनशील देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची विक्रमी खरेदी हे किमती वाढण्याचे कारण असल्याचे सांगण्यात आले. मात्र सोन्यात मोठी घसरण दिसून आली. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात २ टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली.
MCX एक्सचेंजवर काल म्हणजेच शुक्रवारी संध्याकाळी सोने 2 टक्क्यांहून अधिक घसरले आणि 71,341 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. त्याचसोबत चांदीचा भाव 201 रुपयांनी घसरला आणि 88,888 रुपये प्रति किलोवर बंद झाला. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात चांदी दरात तब्बल २५०० रुपयापर्यंतची घसरण दिसून आली होती. एकदाच दिवसात चांदी दरात जवळपास २७०० ते २८०० रुपयांची घसरण झाली.
जळगाव सराफ बाजारातील दर:
शुक्रवार सायंकाळी जळगाव सराफ बाजारात सोने दरात ४०० रुपयापर्यंतची घसरण दिसून आली. यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ७२,७०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला आहे. यापूर्वी सोन्याचा दर ७३,१०० रुपयांवर होता. दुसरीकडे चांदीचा दर विनाजीएसटी ९०,००० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.