जळगाव लाईव्ह न्यूज । होऊ घातलेल्या जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शांततेत पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या ९१ जणांविरुद्ध प्रतिबंधित आदेश काढण्यात आले असून या सर्वांना १५ दिवस महापालिका क्षेत्राबाहेर पाठविले जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी दिली.

येत्या १५ जानेवारी रोजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होईल, तर १६ रोजी मतमोजणी पार पडणार आहे. दरम्यान, महापालिका निवडणूक शांततेत पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाईसह ठिकठिकाणी नाकाबंदी, गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई केली जात आहे.

यासोबतच दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, अशी ९१ जणांची यादीच तयार करण्यात आली असून, त्यात आणखी भर पडणार आहे. या सर्वांना १५ दिवस शहराबाहेर पाठविले जाणार असून, तशी एकतर्फी आदेश बजावणी करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेल्या ९१ जणांमध्ये सर्वाधिक ३० जण एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. तर एमआयडीसीमधील ३०, शनिपेठ २२, जिल्हापेठ १२, शहर ११, तालुका ६ व रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १० गुन्हेगारांचा समावेश आहे.






