सोमवार, सप्टेंबर 11, 2023

रक्षाबंधनाच्या दिवशी भुसावळमार्गे धावणाऱ्या 8 रेल्वे गाड्या रद्द, स्टेशनवर जाण्यापूर्वी वाचा संपूर्ण यादी..

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२३ । रक्षाबंधनसारखा सण अवघा एका दिवसावर येऊन ठेपला असून अशातच रेल्वेकडून तांत्रिक कामांमुळे ब्लॉक घेतला जात आहे. परिणामी अनेक गाड्या रद्द केल्या जात आहे. अशातच आता मूर्तिजापूर रेल्‍वे स्‍थानकानजीक लांब पल्‍ल्‍याच्‍या लूप मार्गासाठी वाहतूक आणि पॉवर ब्‍लॉक घेण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे आठ रेल्‍वेगाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत.

उद्या म्हणजेच ३० ऑगस्‍ट रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ३१ ऑगस्‍ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंत हा ब्‍लॉक घेण्‍यात येणार असल्यामुळे आठ रेल्‍वेगाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत. यामुळे ऐन रक्षाबंधनच्या गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

या गाड्या रद्द?
पॉवर ब्‍लॉकमुळे ०११२७ लोकमान्‍य टिळक टर्मिनस-बल्‍लारशाह विशेष एक्‍स्‍प्रेस (२९ ऑगस्‍ट), ०११२८ बल्‍लारशाह- लोकमान्‍य टिळक टर्मिनस विशेष एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), १११२१ भुसावळ-वर्धा एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), १११२२ वर्धा-भुसावळ एक्‍स्‍प्रेस (३१ ऑगस्‍ट), २२११७ पुणे-अमरावती एसी एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), अमरावती-पुणे एसी एक्‍स्‍प्रेस (३१ ऑगस्‍ट), ०१३६५ भुसावळ-बडनेरा विशेष पॅसेंजर (३१ ऑगस्‍ट) आणि बडनेरा-भुसावळ (३१ ऑगस्‍ट) या रेल्‍वेगाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत.

यापूर्वी रद्द घोषित करण्‍यात आलेल्‍या सहा रेल्‍वेगाड्या पूर्ववत धावणार आहेत, त्‍यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अमरावती एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), १२१३६ नागपूर-पुणे एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), पुणे-नागपूर एक्‍स्‍प्रेस (३१ ऑगस्‍ट), १७६४१ काचिगुडा-नरखेड एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट) आणि १७६४२ नरखेड-काचिगुडा एक्‍स्‍प्रेसचा (३० ऑगस्‍ट) समावेश आहे. काचिगुडा-नरखेड एक्‍स्‍प्रेस अकोलापर्यंत धावणार आहे, तर नरखेड-काचिगुडा एक्‍स्‍प्रेस अकोला येथून सुटणार आहे, अशी माहिती मध्‍य रेल्‍वेच्‍या भुसावळ विभागाकडून देण्‍यात आली आहे.