जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२५ । प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या परीक्षा संपल्या आहेत. यंदा पंधरा दिवस उशिरा शाळांना सुट्या लागल्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू होत असून यामुळे अनेक लोकांची नातेवाईकांकडे, गावाला जाण्याची लगबग सुरू होते. लहान मुलांनाही मामा, मावशीच्या, आजी-आजोबांकडे जाण्याची उत्सुकता असते आणि सुरू होते एकच घाई…हेच लक्षात ठेवून एसटी महामंडळाने उन्हाळी जादा फेऱ्यांच्या नियोजन केलं. दि. २७ पासून ७५९ उन्हाळी जादा बसेसच्या फेऱ्या जळगाव विभागाकडून सुरू झाल्या आहेत.

राज्य शासनाने सर्व शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू केल्याने यंदा प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परीक्षा पंधरा दिवस लांबल्या. त्यामुळे देखील उशिरा आल्याने एसटीच्या १० ते १५ एप्रिल पासूनच उन्हाळी सुट्यांमध्ये धावणाऱ्या एसटीच्या जादा फेऱ्या रविवार दि. २७एप्रिलपासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता यंदा जळगाव एसटी विभागाकडून नियोजन केले गेले असून, ११ आगारातील ७५९ बसचे फेऱ्यांचे नियोजन एसटी विभागाने केले आहे.
नाशिक, पुणे, संभाजीनगर, मुंबई, अकोलासह इतर मार्ग
जळगाव शहरातून तसेच अन्य आगारातून लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये सुट्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. यात नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, अकोला, अमरावती, नागपूर आदी मार्गावरील गाड्यांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे.
अडीच लाख किलोमीटरचे नियोजन
उन्हाळ्यातील सुटीत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दरवर्षी वाढत असते. त्यानुसार अडीच लाख किलोमीटर बसफेऱ्या धावण्याबाबत नियोजन केले जाणार आहे. दररोज साधारण २००० बसफेऱ्या धावण्याचे नियोजन एसटी विभागाचे असणार आहे. मानव मिशन अंतर्गत व अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत जिल्ह्यात अडीच हजार विद्यार्थ्यांसाठी दररोज दोनशे बस फेऱ्या धावतात. सुट्या लागल्यावर या एसटी बसेस जिल्हा अंतर्गत ज्या मार्गावर प्रवाशांची गर्दी आहे तेथे धावणार आहे.