जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येतेय. अशातच तलाठी कार्यालयातील शिपायाने ७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना जळगाव खुर्दमध्ये घडली. या घटनेप्रकरणी तब्बल दोन महिन्यानंतर सोमवारी तलाठी कार्यालयातील शिपाईविरोधात नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकी काय आहे घटना?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव खुर्द येथे सात वर्षीय मुलगी आपल्या आजीसह वस्तव्याला आहे. १० जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आजी ह्या सातवर्षीय मुलीसोबत जळगाव खुर्द येथील तलाठी कार्यालयात कामानिमित्त आल्या होत्या. तलाठी कार्यालयात तलाठी मॅडम नसल्यामुळे आजी ह्या नातीसोबत थोडा वेळ थांबल्या. नंतर मुलीला तहान लागल्याने तिला कार्यालयात बसवून आजी कार्यालयाबाहेर असलेल्या नळावर पाणी घेण्यासाठी गेल्या.
याचदरम्यान तलाठी कार्यालयातील शिपाई याने मुलीची चड्डी काढून तिचा विनयभंग केला. मुलगी ही रडत रडत आजी कडे धावत आली. आजीने नातीला नेमकं काय झाल विचारल्यावर, तिने शिपाई याच्याकडे बोट दाखवित त्याने माझी चड्डी ओढल्याचे नातीने आजीला सांगितले. याप्रकरणी दोन महिन्यानंतर सोमवारी ५ सप्टेंबर रोजी आजीने दिलेल्या तक्रारीवरून तलाठी कार्यालयातील शिपाई भैय्या याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.