जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ । जळगावातील निमखेडी शिवारातील विठ्ठलवाडीत एका ६ वर्षीय बालकाचा एसीच्या कॉम्प्रेसरमधील विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. केशव ललित चव्हाण (वय ६) असे या मृत बालकाचे नाव आहे. दरम्यान, एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने मातेने एकच आक्रोश केला.
याबाबत असे की, आई दिव्या या दुपारी तीन वाजता गच्चीवर वाळत टाकलेले कपडे काढण्यासाठी गेल्या असता मुलगा केशवदेखील त्यांच्या मागे गेला. आई कपडे काढत असताना खेळतानाच त्याचा एसीच्या कॉम्प्रेसरला धक्का लागला. त्यात वीजप्रवाह असल्याने केशव जागेवरच कोसळला.
घाबरलेल्या दिव्या यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने डॉक्टरकडे नेले, मात्र तेथे पोहोचण्याच्या आतच आईच्या मांडीवर त्याची प्राणज्योत मालवली. दिव्या व ललित यांना केशव हा एकुलता एक मुलगा होता. चव्हाण कुटुंब मूळचे वनोली, ता. यावल येथील रहिवासी आहेत.