जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२५ । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज कुठे ना कुठे घरफोडी, वाहनचोरीसह चैन चोरीच्या घटना घडताना दिसत असून येत आहे. अशातच मुक्ताईनगर पोलिसांनी एसटीत चढताना होणाऱ्या गर्दीत प्रवाशांचे पैसे, दागिने लांबवणाऱ्या सहा महिलांना जेरबंद केलं. त्यांच्याकडून इतरही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता समोर आली.

मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील रहिवासी सरलाबाई आणि त्यांचे पती जिजाबराव पाटील हे दोघे १५ मे रोजी सकाळी १० वाजता सुकळी येथून रिक्षाने मुक्ताईनगरकडे निघाले. पोस्ट ऑफिसमधील काम आटोपून दुपारी १२ वाजता घरी जाण्यासाठी मुक्ताईनगर बसस्थानकात आले. तेथे कुन्हा गाडीत चढत असताना गर्दीचा फायदा घेत पाच ते सहा अनोळखी महिला संशयास्पद हालचाली करत होत्या. त्यापैकी एका महिलेने सरलाबाई जवळील सोन्याचे दागिने आणि पैसे असलेली छोटी पर्स लांबवली. हा प्रकार लक्षात येईपर्यंत महिला बस स्थानकातून पसार झाल्या. या प्रकाराने घाबरलेल्या स्थितीत सरलाबाई रडत होत्या. शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सौंदळे यांनी घडलेला प्रकार जाणून घेत पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांना माहिती दिली. त्यांनी एपीआय राजेंद्र चाटे, हवालदार महेंद्र सुरवाडे, गोविंद पवार, सुवर्णा पाटील यांना बसस्थानकात पाठवले. पथकाने सरलाबाई व इतर प्रवाशांना विचारणा बोदवड चौफुलीकडे संशयित महिलांचा शोध घेतला. त्यात सहा संशयित महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ सरलाबाई पाटील यांची चोरलेली पर्स हस्तगत केली. गुन्हा दाखल करून महिलांना अटक करण्यात आली. शुक्रवारी सहापैकी दोघांना पोलिस कोठडी मिळाली.
दोघांना पोलिस कोठडी
पोलिसांनी १६ मे रोजी संशयितांना न्यायालयात हजर केले. कविता जगन नाडे (वय ४५), काजल संजय नाडे (३५), फुलाबाई चरणदास नाडे (४५, सर्व रा. रामेश्वर नगर टोला, नागपूर), सीमा संजय लोंढे (४०, रा. कन्हान पिंप्री नागपूर) यांची कारागृहात रवानगी केली. मालता एलवी हातागळे (वय ३५, रा. कन्हान पिंप्री) व रेशीका नरेंद्र नाडे (२०, रा. रामेश्वर नगर, नागपूर) यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.