जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या भुसावळ शहरातील २५ लाख ४२ हजार रुपयांच्या लुटीचा उलगडा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत केला आहे. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार कोणी बाहेरचा नसून, फिर्यादी मोहम्मद यासीन ज्या रॉयल कंपनीत कामाला आहेत, त्याच कंपनीचा ड्रायव्हर शाहीद बेग असल्याचे निष्पन्न झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे,

पोलिसांनी चालक शाहीद बेग (२५, रा. भुसावळ) याच्यासह एकूण सहा संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून लुटीच्या रकमेपैकी सुमारे २३ लाख ४२ हजार रुपये तसेच तीन भ्रमणध्वनी हस्तगत करण्यात आले आहेत. शुक्रवारी, झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी ही माहिती दिली.

२८ ऑक्टोबर रोजी रात्री १०:२० वाजता फिर्यादी मोहम्मद यासीन हे २५ लाख ४२ हजार रुपये बॅगेत घेऊन मोटार सायकलने घरी जात असताना खडके शिवारातील कच्च्या रस्त्यावर तीन अनोळखी इसमांनी धक्का देऊन पैशाची बॅग बळजबरीने हिसकावली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपासात फिर्यादीच्या कंपनीचा ड्रायव्हर शाहीद बेग याच्यावर संशय बळावला.

चौकशीत, शाहीद बेगनेच पैशांच्या ने-आण करण्याच्या वेळेची माहिती त्याचे साथीदार मुजाहीद मलीक आणि मोहम्मद दानिश यांना दिल्याची कबुली दिली. त्यानंतर या तिघांनी रावेर तालुक्यातील अजहर फरीद मलक, अमीर खान युनुस खान आणि ईजहार बेग इरफान बेग या तिघांच्या मदतीने प्रत्यक्ष दरोडा टाकला. पोलिसांनी मुख्य सूत्रधार शाहीद बेगसह एकूण ६ आरोपींना शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी अटक केली आहे. त्यांच्याकडून लुटीच्या रकमेपैकी २३ लाख ४२ हजार रुपये रोख आणि ३ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.
आरोपींपैकी काहींवर मलकापूर आणि रावेर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तपास पथकाने आरोपींना ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळवली असून, उर्वरित २ लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्याचे काम सुरू आहे. उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश गायकवाड हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.





