जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२३ । सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने (ED) च्या कारवाईसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. ईडीकडून राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून जळगावचे (Jalgaon) माजी आमदार मनीष जैन (Manish Jain) आणि माजी खासदार ईश्वर जैन (Ishwar Jain) यांच्या सुमारे ३१५ कोटी रूपये मूल्य असणार्या ७० मालमत्ता जप्त केल्या. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
जैन कुटुंबाने स्टेट बँकेकडून (SBI) घेतलेल्या आणि थकीत कर्जाच्या संदर्भात ईडीच्या (ED) पथकाने जळगावमधील प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर छापा टाकला होता. यात सखोल चौकशी करण्यात आली असून यानंतर मनीषदादा जैन आणि त्यांच्या कुटुंबियांची ईडीतर्फे चौकशी देखील करण्यात आली होती. यानंतर ईडीने आज मोठी कारवाई केली असून दरम्यान, या कारवाईमध्ये ईडीचे एकूण 60 कर्मचारी आणि अधिकारी सहभागी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, मानराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड व आर.एल. गोल्ड प्रा. लि. या कंपन्यांच्या ७० मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. यात या कंपन्यांच्या मालकीच्या जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छ येथील मालमत्तांचा समावेश आहे. ही कारवाई पीएमएलए कायद्याच्या अंतर्गत करण्यात आल्याची माहिती ईडीने आपल्या ट्विटमधून दिली आहे.