⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | बातम्या | भुसावळ स्थानकावर 33 हजारांचा गांजा जप्त

भुसावळ स्थानकावर 33 हजारांचा गांजा जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । भुसावळातील सतर्क रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्‍यांनी प्रवाशाच्या संशयास्पद हालचालीनंतर त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या बॅगेतून 33 हजार रुपये किंमतीचा तीन किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. अप नवजीवन एक्स्प्रेस आल्यानंतर मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ज्ञानेश्वर प्रकाश राठोड (21, नेरे रायगड, महाराष्ट्र) असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो मुंबईतील एमपीआयएल कंपनीत नोकरीस आहे. दरम्यान, आरोपीला हा गांजा त्याच्या मित्राने ब्रह्मपूर, बालिगुडा येथे बोलावून दिला व तो मुंबईत आणण्यास सांगितल्याची कबुली आरोपीने दिली आहे. रात्री उशिरा लोहमार्ग पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.


मंगळवारी सकाळी अप नवजीवन एक्स्प्रेस आल्यानंतर प्लॅटफार्म क्रमांक पाचवर खंडवा बाजूच्या दिशेने एक तरुण संशयास्पदरीत्या वावरत असल्याची बाब कर्तव्यावर असलेल्या प्रेम चौधरी, नितीन पाटील, सुनील खानन्दे यांना जाणवल्याने त्यांनी प्रवाशास थांबण्याचा इशारा केला मात्र सुरक्षा बलाला पाहताच आरोपी पसार झाल्याने कर्मचार्‍यांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेत रेल्वे सुरक्षा बलाच्या ठाण्यात आणले. आरोपीच्या बॅगेची पंचांसमक्ष झडती घेण्यात आल्यानंतर त्यातीन तीन किलो 268 ग्रॅम वजनाचा व 32 हजार 680 रुपये किंमतीचा गांजा आढळल्याने तरुणास गांजासह ताब्यात घेवून अधिक कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, हा गांजा मित्र धोंडवा याने ब्रह्मपुर, बालिगुडा येथे दिल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले असून दोन्ही मित्र मुंबईतील एमपीआयएल कंपनीत नोकरीला असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. रेल्वेद्वारे हा गांजा मुंबईत नेत असल्याचे आरोपीने सांगितले.


रविवार, 13 फेब्रुवारी 2022 रोजी भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी दोन लाख रुपये किंमतीच्या सुमारे 20 किलो गांजासह दोघांना अटक केली होती. पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस भुसावळ रेल्वे स्थानकावर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. सुरुवातीला दोघे संशयीत अल्पवयीन असल्याचे सांगितले होते मात्र रेल्वे पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयीत संजना ठाकूर (20, रा.भोपाळ, मध्य प्रदेश) ही सज्ञान असल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, पावणेदोन महिन्याच्या अंतरात भुसावळात गांजा पकडण्यात आल्याने भुसावळ रेल्वे जंक्शन गांजा तस्करीचे केंद्र ठरत असल्याचे या कारवाईतून दिसून येत आहे. रेल्वेने मोठ्या प्रमाणावर गांजा तस्करी होत असल्याचा संशय असून सुरक्षा यंत्रणा गाड्यांची कसून तपासणी केल्यास अनेक गैरप्रकार समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.