जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२६ । जळगाव महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना निवडणुक काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील २७ सराईत गुन्हेगारांना नऊ दिवसांसाठी हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी बजावले आहे.

रामानंदनगर, जिल्हापेठ, एमआयडीसी व शनी पेठ पोलिस हद्दीत गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या २७ जणांविरोधात पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावांची पडताळणी केल्यानंतर, प्रांताधिकारी विनयकुमार गोसावी यांनी गुरुवारी या गुन्हेगारांना शहरातून तडीपार करण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे समाजकंटकांचे धाबे दणाणले आहेत.

यामध्ये कारवाई ८ ते १७ जानेवारी या कालावधीसाठी आहे. हद्दपारी झालेल्या व्यक्ती महापालिका निवडणुकीसाठी मतदार असतील, तर त्यांना मतदानाच्या दिवशी १५ जानेवारीला जळगाव शहरात केवळ दोन तासासाठी येता येणार आहे. या आदेशानुसार, अवैध वाळू वाहतूक प्रकरणी तलाठ्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर देखील हद्दपारीची कारवाई झाली आहे.



