जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने उन्हाचे चटके बसू लागले आहे. यातच रोलरच्या सावलीत बसून गेम खेळणे पारोळा येथील तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. रोलरच्या सावलीत बसून गेम खेळणाऱ्या १९ वर्षीय युवकाचा रोलरखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना १३ रोजी सकाळी ९ वाजता म्हसवे गावापुढील महामार्ग बायपासच्या कामावर घडली.पुष्पराज गजानन बारी (रा.पारोळा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
इंदूर येथील एआयडीपीएल कंपनीने महामार्ग क्र. ६ वरील बायपासचे काम घेतले अाहे. त्याठिकाणी पुष्पराज गजानन बारी (रा.पारोळा) हा तरुण कामाला होता. १३ रोजी तो सकाळी कामावर हजर झाला. उन्हाचे चटके बसत असल्याने तो जवळच उभ्या असलेल्या रोलरच्या सावलीत बसून मोबाइलवर गेम खेळत होता. त्याचवेळी अचानक चालकाने रोलर सुरू केला. त्यामुळे रोलरचे चाक पुष्पराजच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेचे वृत्त कळताच बारी समाजबांधवांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी समाज बांधवांनी दोषींवर गुन्हा दाखल करून त्वरित मोबदला मिळावा, अशी मागणी केली. याबाबत समाधान पाटील (रा.भोकरबारी) यांच्या फिर्यादीवरून रोलरचालक गौरी शंकर (रा.मथुरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
एकुलता एक
मृत पुष्पराज हा मूळ धुळे येथील रहिवासी होता. लहानपणी वडील वारल्याने तो पारोळा येथे त्याचे मामा गणेश बारी यांच्याकडे राहत होता. तो कुटुंबात एकुलता एक होता. त्याच्या पश्चात आई, मोठी बहीण, मामा, मामी असा परिवार आहे.