⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

परसाडे येथे किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबीर

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१ । सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉ. नसीमा तडवी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत किशोरवयीन ( ११ ते १९ वर्ष वयोगटातील ) मुलींना योग्य व शास्त्रीय मार्गदर्शनाची गरज ओळखून ग्रामीण भागात गावागावात जाऊन विशेष मार्गदर्शनपर शिबिर घेऊन एक सुत्य असा उपक्रम राबवित आहेत. परसाडे या गावात कोविड१९च्या नियमांचे पालन करून शिबीर घेण्यात आले.
किशोरवयीन वयोगटातील मुला-मुली मध्ये शारीरिक व मानसिक बदल होत असतात. या दरम्यान त्यांना अनेक प्रश्न व शंका निर्माण होत असतात. परंतु आपल्या समाजात लैंगिक ह्या विषयावर मोकळेपणाने बोललेच जात नाही. पालक व शिक्षक ही ह्या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसून येत नाही. व त्यांच्या मनातील प्रश्न व शंकाचे समाधान होत नाही. परिणामी लैंगिक विषयावर असलेला गैरसमजुती वाढीस लागून त्याचे मानसिक व शारीरिक आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती असते. आजचे विद्यार्थी हे उद्याचे तरुण असतील. त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य हे निरोगी व सशक्त असायला हवे. म्हणून किशोरवयीन वयोगटातील मुला-मुलींना योग्य व शास्त्रीय मार्गदर्शनाची गरज ओळखून डॉ.नसीमा तडवी गावागावात जाऊन किशोरवयीन मुलींसाठी हा उपक्रम राबवित आहेत.परसाडे येथे गावात मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. शिबिरास मोठ्या संख्येने आदिवासी मुलीं सहभागी झाल्या होत्या.

डॉ. नसीमा तडवी यांनी उपस्थित किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक समस्या, वैयक्तिक स्वच्छता, होणारे शारीरिक बदल व मासिक पाळी विषयी समस्या आदी विषयाबाबत आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. व मुलींच्या शंका व समस्या जाणून घेऊन त्याचे निरसन केले. तर काही मुलींसोबत त्यांच्या आई (माता) सुद्धा आलेल्या होत्या त्यांनीही मुलींच्या समस्या सांगितल्या त्यांच्या ही शंका व समस्यांचे निराकरण डॉ. तडवी यांनी केले. यावेळी आलेल्या सर्व किशोरवयीन मुलींची मोफत रक्त (H.B.) तपासणी करण्यात आली. व आवश्यकतेनुसार सर्वांना लोह आणि कॅल्शियम ची मोफत औषधी देण्यात आली.

यांची होती उपस्थिती  
आरोग्य सेविका मेहमूदा तडवी , गटप्रवर्तक सरला तडवी, आरोग्यसेवक भुषण पाटील, संजय तडवी, अंगणवाडी सेविका संगीता तडवी, आशासेविका हिराबाई तडवी, फरीदा तडवी, समीर तडवी, सायरा तडवी यांनी उपस्थिती होती.