जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२५ । मुंबईच्या पवईमधून आज गुरुवारी दिवसाढवळ्या हादरवून टाकणारी एक खळबळजनक घटना घडली. पवईतील आरए स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या आणि यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या रोहित आर्या याने १७ मुलांना डांबून ठेवलं आहे. पोलिसांनी मोठ्या शर्थीने ओलीस मुलांना सोडवून आरोपी रोहित आर्यच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नेमका प्रकार काय?
मुंबईतील आरए स्टुडिओमध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुलांसाठी ऑडिशन्स सुरू होते. युट्यूबर असल्याचा दावा करणारा रोहित आर्या हा ऑडिशन्स घेत होता. आज गुरुवारी सकाळी त्याने सुमारे १०० मुलांना ऑडिशन्ससाठी आमंत्रित केले होते. दुपारी १ वाजेपर्यंत त्याने सुमारे ८० मुलांना घरी पाठवले होते, तर उर्वरित मुलांना एका खोलीत बंद केले होते. जेव्हा मुले आवाज करू लागली आणि खिडक्यांमधून बाहेर डोकावू लागली तेव्हा लोकांना काहीतरी गडबड असल्याचे जाणवले आणि त्यांनी लगेच पोलिसांना कळवले.

माहिती मिळताच, मुंबई पोलिसांच्या अनेक पथके घटनास्थळी पोहोचली. स्टुडिओला घेराव घालण्यात आला आणि परिसर सील करण्यात आला. पोलिसांनी मोठ्या शर्थीने ओलीस मुलांना सोडवून आरोपी रोहित आर्यला अटक केली.

दरम्यान, मात्र, आरोपीची नेमकी मागणी कोणती होती? त्यानं व्हिडिओ शेअर करून मागणीबाबत माहिती दिली. या व्हिडिओत रोहितने मुलांना ओलीस ठेवण्यामागचं कारण सांगितलं, ‘मी रोहित आर्य. आत्महत्या करण्याऐवजी मी एक प्लॅन तयार केला आणि काही मुलांना डांबून ठेवलं. माझ्या फार काही मागण्या नाहीत. फक्त नैतिक डिमांड आहेत. पण माझे काही प्रश्न आहेत. माझ्या प्रश्नांची मला उत्तरे हवी आहेत’, असं रोहित आर्य म्हणाला.
‘ना मी आतंकवादी आहे, ना माझी पैशांची मागणी आहे. मला काही लोकांशी संवाद साधायचा आहे. याच कारणामुळे मी या मुलांना एका खोलीत ओलीस ठेवलं. प्लॅन तयार करूनच मी मुलांना ओलीस ठेवलं. तुमच्याकडून जराही चूक झाली, तर मी ट्रिगर होईल. मी संपूर्ण जागेवर आग लावेन. स्वत: मी देखील आयुष्य संपवेन. मी आयुष्य संपवेन अथवा नाही. पण उगाच मुलांनाही याचा त्रास होईल. त्यांच्या मनावर आघात होईल’, असं व्हिडिओत रोहित आर्य म्हणाला.


