जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२३ । मध्य प्रदेशमधील खरगोन जिल्ह्यात प्रवासी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. इंदूरकडे जाणारी खासगी बस हातिनी नदीवर बांधलेल्या पुलावरून खाली पडली. यात 15 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 20 हुन अधिक प्रवाशी जखमी झाल्याची घटना समोर आलीय. राज्य सरकारने अपघातातील जखमींवर मोफत उपचार तसेच मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी एक बस इंदूरच्या दिशेने जात होती. बस खरगोनमधील खरगोन टेमला मार्गावरील दसंगाजवळ आली असता चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित बस पुलावरून खाली पडली. यात 15 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 20 हुन अधिक प्रवाशी जखमी झाले.
बस पुलावरून खाली पडल्यानंतर मोठा आवाज ऐकून आसपासच्या ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आणि पोलिसांनाही अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीसही सक्रिय झाले. तत्काळ घटनास्थळी रुग्णवाहिका रवाना करण्यात आली आणि पोलिसांचे पथकही पाठवण्यात आले. पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच गावकऱ्यांनी अनेक जखमींना ट्रॅक्टर ट्रॉलीतून जवळच्या रुग्णालयात पाठवले.