⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

वाळूचे १४ ठेकेदार ‘फौजदारी’च्या दारात; अभियंतेही रडारवर

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ ।  जि.प. मालकीच्या पाझर तलावातून अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक करण्यासाठी महसूल विभागाच्या नावे असलेल्या बनावट वाळूच्या पावत्या बनवून शासनाची फसवणूक केली होती. याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील चार तालुक्यात अपहार झाल्याचे निष्पन्न झाले असून, १४ कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओ पंकज आशिया यांनी दिले. तर जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाशी संबंधित उपविभागातील अभियंत्याच्या कारवाईबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच ज्युनिअर इंजिनिअर, शाखा अभियंता बोगस पावत्यांसाठी यांना नोटीस बजावून याबाबत खुलासे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात बोगस पावत्यांसाठी राजमुद्रेचा गैरवापर करण्यात आल्याबाबत सावकारे यांचा पाठपुरावा सुरू होता. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेत १५ नोव्हेंबरला संबंधित कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करून रक्कम व्याजासह वसूल करण्याचे आदेश काढले आहेत. डेप्युटी इंजिनिअर यांच्यावरील कारवाईबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच ज्युनिअर इंजिनिअर, शाखा अभियंता बोगस पावत्यांसाठी यांना नोटीस बजावून याबाबत खुलासे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

६३ लाख ५० हजारांची केली अफरातफर

अवैध गौण खनिज प्रकरणात जळगाव, एरंडोल, भडगाव, पाचोरा या तालुक्यांतील ३६ कामांमधील रॉयल्टीची रक्कम न भरता त्याच्या बनावट पावती दाखवून ६३ लाख ५० हजार ४११ रुपयांची अफरातफर झाली आहे. ही सर्व रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

अभियंतेही रडारवर

या सर्व कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचे आदेश बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सीईओनी दिले असल्याची माहिती पल्लवी सावकारे यांनी दिली, तर याच प्रकरणात ३ उप १ कनीष्ठ व ५ शाखा अभियंतांचा समावेश आहे. तर एका निवृत्त अभियंत्याचादेखील समावेश आहे.