जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२३ । राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील तरतुदींची अंमलबजावणी करताना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षण-परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केल्या असून ज्यामध्ये शालेय शिक्षण आणि परीक्षांबाबत मोठे बदल जाहीर केले आहे.आता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून एकदाच घेण्याची प्रथा आता भूतकाळात गेली आहे. कारण आता देशभरात बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाणार आहेत.
मंत्रालयाने आज म्हणजेच बुधवारी जारी केलेल्या अपडेटनुसार, बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा घेतल्या जातील. विशेष म्हणजे, आत्तापर्यंत सर्व राज्य मंडळाच्या, मग ते केंद्रीय बोर्ड असोत, 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून एकदाच घेतल्या जातात. मात्र यापुढे आता बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. त्याचसोबत ११वी आणि १२वीच्या अभ्यासक्रमातही बदल करण्यात आले आहेत.
म्हणजेच आता विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. सध्या सर्व मंडळांच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थी विज्ञान, वाणिज्य, कला, व्यावसायिक इत्यादींपैकी कोणताही एक विषय निवडतात. तसंच, विद्यार्थ्यांना दोन्ही सेमिस्टरचे सर्वोत्तम गुण निवडण्याची परवानगी दिली जाईल.
11वी-12वी मध्ये दोन भाषांचा अभ्यास करावा लागेल
शिक्षण मंत्रालयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार, इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागेल, त्यापैकी किमान एक भारतीय असावी. म्हणजेच 11वी आणि 12वीमध्ये विद्यार्थ्यांना दोन भाषांचे विषय निवडावे लागणार आहेत.
2024 मध्ये नवीन पॅटर्न लागू केला जाईल
शिक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवीन अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. आता त्यानुसार पुस्तके तयार केली जातील. जे 2024 सत्रापासून लागू होईल. म्हणजेच बोर्डाच्या परीक्षांबाबत केलेली घोषणा २०२४-२५ या सत्रापासून लागू केली जाईल.