जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२३ । चाळीसगाव तालुक्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका लग्न समारंभातील जेवणातून सुमारे १०० लोकांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली असून विषबाधा झालेल्यांना उपचारासाठी शहरातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यात तरुण, वृद्ध व महिलांचा समावेश आहे. यापैकी चार वृद्ध महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ही विषबाधा कोणत्या अन्नातून झाली? याबाबत माहिती मिळाली नाही. बाधितांची संख्या वाढल्याने अनेक वऱ्हाडी भयभीत झाले आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील एका कुटुंबातील मुलाचा विवाह शहरातील हिरापूररोड असलेल्या लॉन्स येथे गुरुवारी पार पडला. या लग्नात जेवणाच्या पंगती पार पडत होत्या. याच जेवणावळीतून अनेकांना उलटी, मळमळ अशाप्रकारचा त्रास जाणवू लागला. उपचारासाठी दाखल झालेले अनेक जण असले तरीही या लग्नातून जेवण करून गेलेल्या बाहेरगावच्या पै-पाहुण्यांची काय परिस्थिती आहे? ते समजू शकले नाही. त्यामुळे बाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज शंभरपेक्षा अधिक असले तरी ही संख्या वाढण्याची शक्यता आहे