प्रवाशांनो इकडे लक्ष द्या.. आज भुसावळ विभागातून धावणाऱ्या ‘या’ 10 रेल्वे गाड्या रद्द
जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२२ । दिवाळी सारखा सण अवघ्या चार दिवसावर आहे. यासाठी शहरांमध्ये व्यवसाय, नोकरीनिमित्त राहणारे लोक घरी जातात. मात्र ऐन सणासुदीत भुसावळ विभागातून धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याच्या निर्णयामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत. मध्य रेल्वेने बुधवारनंतर आज गुरूवारी (दि. २०) देखील मनमाड जवळ ब्लॉक घेतला आहे. यामुळे महाराष्ट्र एक्स्प्रेससह अन्य १० गाड्या रद्द करण्यात आल्या.
मनमाड-दौंड सेक्शनमध्ये दुहेरी लाईन नॉन इंटर लॉकिंगचे काम निघाले आहे. त्यासाठी ब्लॉक घेतल्याने रेल्वे प्रशासनाने १० गाड्या रद्द केल्या आहेत. ज्या प्रवाशांनी दाेन महिने आधीपासून कन्फर्म तिकीट काढून ठेवले हाेते, त्यांचे ऐनवेळी गाडी रद्द केल्याने वांधे होतील.
दरम्यान, रद्द झालेल्या गाड्यांमध्ये दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस १९ व २० ऑक्टाेबर, साईनगर-दादर एक्स्प्रेस १९ व २० ऑक्टाेबर तसेच पुढील गाड्या बुधवार, गुरुवारी रद्द केल्या आहेत. यात पुणे-निजामाबाद (१९), निजामाबाद-पुणे (१९ व २०), गाेंदिया-काेल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस (१९ व २०), भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस दाेन्ही बाजूने दि. २० रोजी रद्द केली आहे. पुणे-नागपूर (२२१४१) ही गाडी गुरूवारी (दि.२०) दाेन्ही मार्गावर रद्द आहे. पुणे-अजनी एक्स्प्रेस शुक्रवारी (दि.२१) रद्द केली आहे.