⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

पावसाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करातयेत? ‘ही’ आहेत जळगाव जिल्ह्यातील १० सर्वोत्तम ठिकाणे!

जळगाव लाईव्ह न्यूज | २० जुलै २०२३ | पावसाळा म्हटलं म्हणजे सर्वत्र हिरवळ बघून आपसूकच फिरावंस वाटतं. परंतु, फिरायला जायचे कुठे हा मोठा प्रश्न असतो. आपला जळगाव जिल्हा आणि जवळपास फिरण्यासाठी सर्वोत्तम १० सुंदर ठिकाण आहेत. जी पावसाळ्यात पर्यटकांना पर्यटनासाठी विशेष आकर्षित करतात. तुम्ही पर्यटनाचा मनमुराद आनंद त्या ठिकाणी लुटू शकतात. तर, जाणून घेऊयात कोणती आहे ती १० सर्वोत्तम पर्यटन स्थळे.

१. पारोळा किल्ला : जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील हा किल्ला पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. हरी सदाशिव दामोदर यांनी १७२७ मध्ये या किल्ल्याची बंधांनी केली होती. हे झाशीच्या राणीचे माहेरघर म्हटले जाते. १७५७च्या उठावात राणी लक्ष्मीबाईंनी येथे आश्रय घेतला होता, असे सांगितले जाते. येथे सुंदर धरण देखील आहे. जळगावातील ऐतिहासिक वारसा लाभलेले हे महत्वाचे ठिकाण आहे.

२. मनुदेवी : सातपुडा पर्वतात वसलेले हे मनुदेवी पर्यटनासाठी आकर्षक आहे. निसर्गरम्य परिसर, ४०० फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा, पाझर तलाव अशी कितीतरी नैसर्गिक सुंदरता मनुदेवी या ठिकाणी पाहण्यास मिळते. असे ही म्हटले जाते की, ब्रम्हा, विष्णू, महेश यांच्यावर संकट आले असता ते राक्षसांपासून सुटका करण्यासाठी गुप्त ठिकाणी लपले होते. ते ठिकाण म्हणजे मनुदेवी.

३. महर्षी कण्व आश्रम : जळगाव मधील कानळदा येथे गिरणा नदीच्या किनाऱ्यावर असलेले हे महर्षी कण्व आश्रम. हिरवाईने वेढलेला आणि शांत परिसर पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. तिथे असलेली गुहा आणि बाग सुद्धा पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरते. तेथील सूर्यास्त पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. महाभारतात प्रसिद्ध असलेल्या महर्षी कण्व ऋषींचे आश्रम हे पर्यटनासाठी उत्तम आहे.

४. हतनूर डॅम : हतनूर डॅम हे जळगाव जिल्ह्यातील एक धरण आहे. तेथे वसलेल्या हतनूर गावाच्या नावावरून हतनूर असे नाव धरणाला दिले गेले आहे. तेथील निसर्गरम्य परिसर विशेषतः पर्यटकांचे आकर्षण आहे.

५. वाघूर डॅम : वाघूर धरण हे जळगाव जिल्ह्यातील वराडशीम जवळ आहे. हे धरण सुद्धा त्याच्या जल साठ्यामुळे आणि निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटकांना अधिक आकर्षित करते. पावसाळ्यात मुख्यतः फिरण्यासाठी हे आकर्षक ठिकाण आहे.

६. पद्मालय : पद्मालय हे गणपतीचे मंदिर आहे जे जळगाव जिल्हयातील एरंडोल जवळ आहे. तिथे असलेल्या विशेष कमळाच्या फुलांमुळे पद्मालय असे उदबोधले आहे. हे मंदिर टेकडीवर वसलेले असल्यामुळे तेथे दगडी वास्तुकला आहे. तेथील कमळांचा तलाव विशेष प्रसिद्ध आहे. हे मंदिर पांडवांच्या काळात बांधले गेले आहे, असे म्हणतात. येथील भीमकुंड देखील प्रसिद्ध आहे.

७. पाटणादेवी : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव जवळील पाटणादेवी हे ठिकाण जंगल सफारीच्या थ्रिलसह पर्यटनासाठी उत्तम आहे. पाटणादेवी या स्थळाला पर्यावरणासह धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व आहे. सह्याद्री पर्वताच्या कुशीत, वनराईच्या सानिध्यात असलेले हे ठिकाण पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे.

८. गारबर्डी धरण : पाल येथे असलेल्या गारबर्डी धरणालाच सुकी धरण असेही म्हणतात. सातपुड्याच्या कुशीत वसलेले हे धरण पर्यटनासाठी उत्कृष्ट आहे. येथील निसर्गरम्य वातावरण आणि प्रवासाचे मार्गातील दृश्ये खूप सुंदर आहेत. तसेच प्रवासमार्गात लागणारे आदिवासी पाडे देखील पाहण्यासारखे आहेत.

९. रुद्रेश्वर : रुद्रेश्वर हे ठिकाण जळगाव जिल्ह्यातील नसले तरी जळगावच्या जवळच आहे. जवळपास २ तासांच्या अंतरावर असलेले हे अतिशय आकर्षक पर्यटन स्थळ आहे. येथे असलेल्या गुफा त्याचप्रमाणे धबधबा येथील विशेष आकर्षण आहे. याला रुद्रेश्वर लेणी किंवा मंदिर असंही संबोधलं जातं. अजिंठा लेणीपूर्वी रुद्रेश्वर लेणी कोरली असावी, असा काही संशोधकांचा अंदाज आहे.

१०. वेताळवाडी किल्ला : सोयगाव जवळील हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय सुंदर आहे. वेताळवाडी घाट आणि जलाशय देशील येथील आकर्षण आहे. घाटाच्या उजवीकडे किल्ला आहे. येथे एक जुनी तोफ देखील आढळते. हा एक डोंगरी किल्ला म्हणून ओळखला जातो. रुद्रेश्वर आणि वेताळवाडी किल्ला ही ठिकाणे ट्रॅकिंग साठी सुद्धा उत्तम आहेत.