जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एक एक करत शिवसेनेतील अनेक नेते, पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहे. अशातच आता साताऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा हादरा बसलाय. साताऱ्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिल्यामुळे उद्धव ठाकरेंसमोरची आव्हानं आता वाढली आहेत.
राज्यातील पालिका निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसा पाठिंबा मिळवण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यात शिंदे गटाचं बळ आता अधिक वाढलंय. साताऱ्यातील शिवसेनेच्या युवा नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिलंय. शिवसेनेचे साताऱ्यातील युवा नेते आणि युवासेवा जिल्हाप्रमुख रणजित सिंह भोसले हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. मुंबईतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी रणजित सिंहे भोसले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला.
रणजितसिंह भोसले हे साताऱ्यातील युवा नेते आहेत. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे साताऱ्यात शिंदे गटाची ताकद वाढली आहे. सातारा जिल्ह्यात शिंदे गटाला आता अधिक समर्थन मिळवण्याच्या दृष्टीने बळ मिळेल, अशा विश्वास व्यक्त केला जातोय.