जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे उन्हाळी परीक्षा या यंदाही ऑफलाइन पद्धतीने न घेता ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्या, अशी मागणी जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील विद्यार्थी संघटनांतर्फे करण्यात येत होती. मात्र यंदाच्या परीक्षा या ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात येणार असल्याच्या निर्णयावर राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू ठाम आहे. त्यामुळे जून महिन्यात परीक्षांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व विद्यापीठाच्या कुलगुरुंसमवेत बैठक घेतली. यावेळी ऑफलाइन परीक्षा घेण्याच्या निर्णयावर कुलगुरू ठाम होते. दरम्यान, विद्यार्थ्यांनादेखील अभ्यासाला वेळ मिळावा यासाठी जून महिन्यात परीक्षा घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे, त्या अनुषंगाने वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना महिन्याभराचा वेळ अभ्यासासाठी मिळणार आहे. परीक्षेसाठी विद्यापीठांतर्फे प्रश्नसंच देण्यात येणार असून दोन पेपरमध्ये दोन दिवसांचे अंतर राहील. तसेच १ जून ते १५ जुलै दरम्यान परीक्षा घेण्यात येणार असल्याचे यावेळेत ठरवण्यात आले आहे.