⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

मोठी बातमी : विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ९ कोटीचा निधी प्राप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२२ । समग्र शिक्षा अभियानांतर्गंत १ लाख ५४ हजार ७४४ मुला-मुलींच्या मोफत गणवेशासाठी ९ कोटी २८ लाख ४६ हजार४०० रुपयांना मंजुरी मिळाली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला एक जोडी गणवेशाची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे सहाशे रुपये प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.


नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व पहिली ते आठवीच्या मुली, आदिवासी मुले, मुली, मागासवर्गीय मुले, मुली तसेच दारिद्रय रेषेखालील मुले या योजनेसाठी पात्र ठरवले जातात. जूनमध्ये शाळा सुरू होणार असल्याने मे महिन्यात मोफत गणवेशासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश वाटपासाठी पात्र लाभार्थ्यांना सहाशे रुपयांचा निधी दिला जाणार आहे. या रकमेतून गणवेश खरेदी करून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी गणवेश परिधान करून हजर राहणे आवश्यक आहे, अशा सूचना शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिल्या आहेत.


समग्र शिक्षा मोफत गणवेश योजना सन २०२२-२३ करिता राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या पत्रान्वये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांतील पहिलीमध्ये शिकत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जातीची मुले, अनुसूचित जमातीची मुले, दारिद्र्य रेषाखालील पालकांची मुले यांना योजनेचा लाभ देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.


जिल्ह्यात ९४५ मुली, ८६०५ अनुसूचित जातीची मुले ३२ हजार ०३१ अनुसूचित जमातीची मुले आणि १९ हजार ५७२ दारिद्रय रेषेखालील पालकांची मुले अशा एकूण १ लाख ५४ हजार ७४४ विद्यार्थ्यांना दोन संच देण्यासाठी प्रति विद्यार्थी ६००रु.याप्रमाणे ९ कोटी २८ लाख ४६ हजार ४०० रुपयांची तरतूद केलेली रक्कम २३ मे रोजी जळगाव जिल्ह्यास प्राप्त झाली असून शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर उपलब्धतेसाठी २४ मे रोजी पीएफएमएमस अंतर्गत कार्यवाही करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सांगितले.


राज्य कार्यालयाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने सभेत निश्चित झालेला गणवेश विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यासाठी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीमार्फत नियोजन करून घेण्याच्या सूचना जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पकज आशिया यांनी पं.स.गटशिक्षणाधिकारी यांना आढावा बैठकीत दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि चांगल्या प्रतीचे गणवेश देण्याचे निर्देश सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी दिले आहेत.