पोलीस ठाण्याबाहेर पोलिसाला मारहाण, माजी नगराध्यक्षासह १० जणांविरुद्ध गुन्हा
जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । शहर पोलीस ठाण्याच्या बाहेरच टॉवर चौकात गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास विनाकारण फिरणाऱ्या तरुणांना हटकल्याचा राग आल्याने काही तरुणांनी चक्क पोलीस कर्मचाऱ्यालाच त्याच्याच काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, जमावाने पोलीस ठाण्यात देखील वाद घातल्याने तणाव वाढला होता. सहाय्यक अधीक्षक आल्यानंतर याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी किशोर निकुंभ हे गुरुवारी आपले कर्तव्य बजावून नातेवाईकांना सोडविण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेले होते. नातेवाईकांना सोडून पुन्हा पोलीस ठाण्यात परतत असताना त्यांना काही तरुण रात्री ११ वाजेच्या सुमारास टॉवर चौकात विनाकारण फिरताना दिसले. इतक्या रात्री कुठे फिरता असा जाब विचारत त्या तरुणांना निकुंभ यांनी हटकले असता पोलीस कर्मचारी आणि तरुणांमध्ये बाचाबाची देखील झाली.
वाद वाढल्याने तरुणांनी पोलीस कर्मचारी किशोर निकुंभ यांच्या दुचाकीची फायबर काठी काढून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी बाहेर आले असता त्यांनी वाद सोडवित पोलीस कर्मचारी किशोर निकुंभ यांच्यासह अमन ढंढोरे व राजवीर ढंढोरे यांना पोलीस ठाण्यात आणले.
पोलीस ठाण्यात आल्यावर मोठा जमाव वाढू लागला. यावेळी पोलीस ठाणे अंमलदार पोलीस नाईक रविंद्र पाटील यांना शिवचरण कन्हैय्यालाल ढंढोरे, संदीप शिवचरण ढंढोरे, विलास मधुकरराव लोट, नितीन जावळे व वाद घालणाऱ्या इतरांनी त्यांना अर्वाच्य भाषेत बोलून अरेरावी केली. तसेच महिला पोलीस कर्मचारी किरण मालवणकर यांना वाईट साईट बोलून तुम्ही पोलीस फार मातले आहे, तुम्हाला पाहावे लागेल. मी माजी नगरसेवक आहे, माझी पॉवर तुम्हाला दाखवतो असे म्हणून धमकी दिली.
पोलीस ठाण्यात जमाव आणि वाद वाढल्याने सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, अर्चित चांडक हे आरसीपी पथक आणि क्यूआरटी टीमसह पोहचले व गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेऊन जमावाला पंगविले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी किशोर निकुंभ यांच्या फिर्यादीवरून अमन उर्फ आशुतोष ईश्वर ढंढोरे, रणवीर ढंढोरे, शिवचरण कन्हैय्यालाल ढंढोरे, संदीप शिवचरण ढंढोरे, विलास मधुकरराव लोट, नितीन जावळे यांच्यासह ४ अनोळखी जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक क्षीरसागर करीत आहेत.