⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

पोलिसांचा विरोध झुगारून सभा घेण्याच्या प्रयत्नातील पदाधिकार्‍यांना घेतले ताब्यात : मुक्ताईनगरात रंगला राजकीय आखाडा

Muktainagar News । जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२२ । मुक्ताईनगरातील महाप्रबोधन यात्रा आणि महाआरती या दोन्ही कार्यक्रमांना परवानगी प्रशासनाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था या कारणास्तव नाकारण्यात आली मात्र त्यानंतरही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभा घेण्याची तयारी चालवल्यानंतर पोलिसांनी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

हॉलमधील सभेलाही परवानगी नाकारली
शुक्रवारी सकाळपासूनच बाळासाहेबांची शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाप्रबोधन व बाळासाहेबांची शिवसेना सभेच्या ठिकाणीच ठाण मांडले. काहीही झाले तरी सभा होणारच असल्याचा त्यांचा पवित्रा होता. तथापि, दुपारी सभेसाठी लागलेले व्यासपीठ आणि अन्य बाबी पोलीस प्रशासनाकडून हटविण्यात आल्या. यानंतर संपर्क प्रमुख विलास पारकर, जिल्हाप्रमुख डॉ.मनोहर पाटील, जिल्हा संघटक गजानन मालपुरे आदी पदाधिकार्‍यांनी मुक्ताईनगर गाठले. त्यांनी युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे आणि त्यांच्या सहकार्‍यांसह वार्तालाप केला. यानंतर शहरातील गोदावरी मंगल कार्यालयातील हॉलमध्ये सभा घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तथापि, पोलिसांनी याला देखील परवानगी नाकारली.

पदाधिकार्‍यांची जोरदार घोषणाबाजी
प्रशासन व पदाधिकारी यांच्यात शाब्दीक वाददेखील झाले. अखेर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलीस प्रशासनाने शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात नेले. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यासर्वांना पोलिस स्थानकात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी पक्षाचे संपर्क प्रमुख विलास पारकर, जिल्हा संघटनप्रमुख गजानन मालपुरे, जिल्हाप्रमुख डॉ.मनोहर पाटील, दीपकसिंग राजपूत व समाधान महाजन, ज्येष्ठ पदाधिकारी मनोहर खैरनार, युवासेना उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे आदींना ताब्यात घेतले व नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

ही तर सरकारची दडपशाही
मुक्ताईनगरात शुक्रवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची सभा असताना त्यास परवानगी नाकारण्यात आली. ही सत्ताधारी व पोलिसांची दडपशाही असल्याचे शिवसेनेचे विलास पारकर म्हणाले.

परवानगी नाकारल्याचा निषेध
बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौकामध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले मात्र प्रशासनाच्या वतीने परवानगी देण्यात न आल्याचा आम्ही निषेध करतो, असे शिवसेना तालुकाध्यक्ष छोटू भोई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रवर्तन चौकात संध्याकाळी साडेसहा वाजता सुमारास आमदार चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन करते व पदाधिकार्‍यांची भेट घेतली.