निर्बंध पाळा, अन्यथा….प्रशासनाचा व्यावसायिकांना इशारा
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२१ । जळगाव जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असतानाच कोरोनाचा डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात कोरोना कमी झाल्याने काही दिवस निर्बंध शिथील केल्याने दिलासा मिळाला. परंतु, कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण वाढू लागले आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी 27 जूनपासून जिल्हाभरात निर्बंधांमध्ये दिलेली सुट रद्द केली आहे.
त्यामुळे पुर्वीप्रमाणेच आता निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. दरम्यान, रविवारी पहिला दिवस असल्याने पालिका व पोलिसांनी समज दिली. दुकानदारांनीही प्रशासनाला सहकार्य केले. परंतु सोमवारपासून नियमांची कडक अंमलबजावणी होणार आहे. त्यात पुर्वीप्रमाणेच गर्दी करणार्यांवर दंडाची आणि दुकान सीलची कारवाई होईल.
जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवेसह दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. तर शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्य व्यवसाय बंद ठेवावे लागतील. त्यानुसार रविवारपासून आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली. सकाळीच पालिका व पोलिसांच्या पथकांनी शहरातील वेगवेगळ्या भागात फेरफटका मारत दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू असलेली दुकाने पटापट बंद करण्यात आल्याने सन्नाटा निर्माण झाला होता.
शहरातील महत्वाचे मार्केट असलेल्या महात्मा फुले व सेंट्रल मार्केट परिसरात रविवारी सुटीच्या दिवशी गर्दी असते. त्यामुळे पालिका व पोलिसांनी शहरातील मोठ्या मार्केटमध्ये लक्ष केंद्रीत केले होते. रविवारी सकाळपासून पालिकेचे पथके फुले मार्केट परिसरात तळ ठोकून होते. पालिकेने निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी सहा पथके नियुक्त केली आहेत. ही पथके सोमवारी सकाळपासून सर्व मोठ्या मार्केटच्या भागात फिरणार आहेत.
पालिकेने नियम मोडणार्यांवर कारवाईसाठी सहा पथकांची नियुक्ती केली आहे. दुसर्या लाटेत अनेक दुकानदार हे पथक गेल्यावर पुन्हा दुकान उघडणे, दुकानात ग्राहकांना प्रवेश देवून बाहेरून दुकान बंद करणे, नियमांचे पालन न करता दुकानात गर्दी करणे असे प्रकार करताना आढळले. त्यामुळे व्यावसायीकांनी नियमांचे पालन करावे. दुपारी 4 वाजेपर्यंत दुकाने बंद करून कारवाई टाळावी अन्यथा दुकाने सिल करून दंडात्मक कारवाई होईल, असा इशारा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिला.