⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | संविधानामुळेच या देशाची एकता, अखंडता टिकून आहे – प्रा.सुषमा अंधारे

संविधानामुळेच या देशाची एकता, अखंडता टिकून आहे – प्रा.सुषमा अंधारे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२२ । संविधान हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्याने लिहिले याचा पुरावा सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेब संविधान देतानाच्या फोटोंमध्ये आहे,या संविधानामुळेच देशातील एकता अखंडता टिकून आहे, राज्यकर्ते तरुणाईला रोजगार देण्याऐवजी त्यांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करून घेत आहेत.मंदिर, मस्जिद, हिंदू मुस्लिम अशा प्रश्नांभोवती फिरणारे राजकारण हे लोकशाहीला आणि सर्वधर्म समभावाला मारक असून आता प्रत्येकाने बोलले पाहिजे,असे आवाहन प्रा.सुषमा अंधारे यांनी केले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तर्फे धरणगाव येथील साने पटांगणावर क्रांतीसूर्य, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या जगातील महान गुरु शिष्यांच्या जयंती महोत्सव निमित्त प्रा.डॉ.सुषमाताई अंधारे यांचे प्रबोधन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्सव समितीचे निमंत्रक तथा माजी उपनगराध्यक्ष दिपक आनंदा वाघमारे यांनी तर वक्त्यांचा परिचय प्रा. बी. एन. चौधरी यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्सव समिती अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस डी.जी.पाटील हे होते. प्रमुख वक्त्या राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी स्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या प्रा. डॉ.सुषमाताई अंधारे व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहूजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. तद्नंतर सामजिक क्रांतीचे जनक राजर्षी शाहूजी महाराज यांचा १०० वा स्मृतिदिन म्हणून १०० सेकंद च्या अधिक मान्यवर व उपस्थितांनी जागेवर स्तब्ध राहून छत्रपती राजर्षी महाराजांना मानवंदना देण्यात आली.


प्रा. सुषमा अंधारे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून महापुरूषांचा जीवनपट उलगडून त्यांचे सामाजिक शैक्षणिक कार्याची माहिती विषद केली. आपल्या महापुरुषांच्या संघर्षावर प्रकाश टाकून विविध उदाहरण दाखले देऊन त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील विद्याविभूषित डॉक्टरेट पदवी प्राप्त करणारे प्रा. डॉ.निर्मला संभू पवार, डॉ.आशा चंद्रकांत सपकाळे, प्रा.डॉ.अतुल सूर्यवंशी, ज्ञानसागर संतोष सूर्यवंशी आणि पीएसआय पंकज जगन्नाथ सपकाळे व पोलिस कर्मचारी हेमंत पौलाद शिरसाठ यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तर कला क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल क्षितिज सोनवणे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


या जयंती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्व वैचारिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन अनमोल सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.