⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

कुस्तीची बातमी : माऊली कोकाटे ठरला पहिला आमदार केसरी

जळगाव लाईव्ह न्यूज :६ एप्रिल २०२३ : चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने माऊली तालीम, पिलखोडच्या वतीने आमदार केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हजारो कुस्ती प्रेमींच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे यांच्यात अंतिम सामना रंगला.

जवळपास 35 हुन अधिक मिनिट कुस्ती सामन्यात निर्णय न झाल्याने अखेर ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांच्या सूचनेनुसार गुणांवर सामन्याचा निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याच्यावर ताबा मिळवत गुण कमवत उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे हा आमदार केसरी -2023 स्पर्धेचा मानकरी ठरला. आमदार मंगेश चव्हाण व ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांच्याहस्ते दोन लाख 51 हजार रुपये रोख व चषक देऊन माऊली कोकाटे यांना सन्मानित करण्यात आले.

500 मल्लांच्या झाल्या कुस्त्या
सदर कुस्ती स्पर्धेत लहान गटापासून ते मोठ्या गटापर्यंत अनेक कुस्त्या मान्यवरांच्या उपस्थितीत लावण्यात आल्या. दुपारी 4 वाजेपासून ते रात्री 10 पर्यंत चाललेल्या या स्पर्धांमध्ये एकूण 500 कुस्त्या झाल्या. त्यात 11 जोड कुस्त्यांना 1.5 लाखांची बक्षिसे, खल्या जोडयांना 2 लाखांची बक्षिसे तसेच 35 हजारांची 250 भांडे बक्षीस स्वरूपात देण्यात आली.

कुस्तीला प्रोत्साहनासाठी दहा कोटींचा निधी मंजूर
आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, चाळीसगाव तालुक्यात कुस्तीची मोठी परंपरा आहे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी या मातीने महाराष्ट्राला दिला आहे. कुस्ती व व्यायामाला प्रोत्साहन मिळावे अत्याधुनिक क्रीडा संकुल, तालीम, 20 अत्याधुनिक व्यायामशाळा, 17 क्रॉसफीट जीम यासाठी 10 कोटी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले तसेच पुढील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चाळीसगाव येथे आयोजित करण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माऊली तालीम, पिलखोड, गिरणा पंचक्रोशीतील कुस्तीगीर व सरपंच, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी परीश्रम घेतले.