मालमत्ता करावरून जि.प.,मनपा आमने-सामने

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । महापालिका प्रशासनाने बड्या थकबाकीदारांना बिलांची नोटीस पाठविण्याचे काम सुरु आहे. मनपाने जिल्हा परिषदेला जी.एस.ग्राउंडसाठी ४ कोटींची  थकबाकीची रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, या मैदानाचे उत्पन्न ७ लाखांचे असताना, मनपाकडून वर्षाला या मैदानाच्या मालमत्ताकराची वसुली २२ लाख इतकी केली जात आहे. त्यामुळे ही रक्कम भरण्यास जि.प.सदस्यांचा विरोध असून, यावरून मनपा व जि.प. प्रशासन आमने – सामने येण्याची शक्यता आहे.

जि.प.च्या स्थायी समितीच्या सभेत मनपाने जि.प.ला बजावलेल्या मालमत्ताकराची रक्कम भरण्याचा नोटीसवरून सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच महापालिकेकडून देखील गिरणा पंपिंग, वाघूर पंपिंग स्टेशन, आव्हाणे शिवारातील घनकचरा प्रकल्प, ममुराबाद शिवारातील मलनिस्सारण प्रकल्प हे जि.प. क्षेत्र अर्थात ग्रा.पं.च्य अखत्यारीत आहे. या माध्यमातून किती कर मिळतो, याची कर आकारणी का केली नाही असा प्रश्न जि.प. सदस्य नाना महाजन यांनी केला आहे.

जि.प.कडून उत्पन्नाचे स्त्रोत वाढविले जात नाही. जर महापालिका आपल्या जागांच्या मालमत्ता कराच्या रक्कमेसाठी जि.प.ला नोटीस पाठवित असेल तर जि.प. ने देखील महापालिका वापरत असलेल्या जि.प.च्या जागांबाबत मनपाकडून कराची वसुली केली जावी अशी मागणी  जि.प.सदस्यांकडून केली जात आहे.

महापालिका वसुलीच्या भूमिकेत 

जि.प.कडे तब्बल ४ कोटींची थकबाकी असून, मनपाने बड्या थकबाकीदारांकडून वसुलीसाठी विशेष मोहिम हाती घेण्यात येणार आहे. जी.एस. मैदानाबाबतीत मनपाने याआधी देखील जि.प.ला नोटीस बजावली आहे. मात्र, मनपाने वसुलीसाठी अजूनही काहीही प्रयत्न केलेले नाहीत. मनपाकडून जि.प.कडे असलेली थकबाकी वसूल केली जाईल, अशी माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

 

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज