जिल्ह्यात शेतमाल तारण योजनेला शून्य प्रतिसाद

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी कृषी पणन मंडळातर्फे शेतमाल तारण कर्ज योजना राबवण्यात येत आहे. शेतमाल साठवणूक करून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास जास्त बाजारभाव मिळू शकतो. मात्र,जिल्ह्यातील शेतकरी आडत्यांकडे शेतमाल ठेवून आगाऊ रक्कम घेऊन गरज भागवतात. त्यानंतर जास्त बाजारभाव मिळाल्यानंतर शेतमालाची विक्री करण्याची पध्दत असल्याने जिल्ह्यात शेतमाल तारण योजनेस शून्य प्रतिसाद आहे.

ही योजना कृषी पणन मंडळातर्फे राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत मूग, उडीद, तूर, सोयाबीन, सूर्यफूल, ज्वारी, बाजरी, मका, गहू आदी शेतमालाचा समावेश करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम ६ महिने कालावधीसाठी ६ टक्के व्याज दराने तारण कर्ज देण्यात येते. ही योजना बाजार समितीमार्फत राबवली जाते. सहा महिन्यांच्या आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्यांना ३ टक्के व्याज सवलत देण्यात येते. मात्र प्रतिसात मिळत नाही.

गेल्या वर्षीची दादर आडत्यांकडे अद्यापही पडून

शेतकरी आडत्यांना शेतमाल देतात.त्यांच्याकडून तात्पुरत्या स्वरूपात आगाऊ रक्कम घेऊन त्यांची गरज भागवतात. आडत्यांकडे गोदामे आहेत. त्या गोदामांमध्ये शेतमाल साठवला जातो. मोठ्या शेतकऱ्यांकडे स्वत:ची साठवणूक व्यवस्था आहे. गरजवंत शेतकरी मिळेल, त्या भावात शेतमाल विक्री करतात. त्यामुळे शेतमाल तारण योजनेला प्रतिसाद शून्य आहे. शेतमालाचे बाजारभाव वाढल्यानंतर शेतकरी आडत्यांकडे ठेवलेल्या शेतमालाची विक्री करतात. जळगाव कृउबासमध्ये गेल्या वर्षीची दादर आडत्यांकडे पडून आहे. असे जळगाव बाजार समिती सभापती कैलास चौधरी यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज